माथेरानमध्ये दिवाळी पर्यटन हंगाम बहरला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

माथेरानची राणी म्हणजे मिनी ट्रेन अतिवृष्टीच्या काळात काही महिन्यांसाठी बंद झाली असली तरी येथील निसर्गाच्या सान्निध्यात पायी चालण्याचा आनंद काही औरच असला तरी मिनी ट्रेनची सफर करण्यासाठी आम्ही पुन्हा माथेरानला येणार, असा विश्‍वास पर्यटक व्यक्त करत होते.

माथेरानः पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सध्या तेजीत आहे. मुलांना दिवाळीची सुटी असल्याने मुंबई, पुणे येथील पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. लांबलेल्या पावसामुळे हिरवीगार वनराई पर्यटकांना साद घालत आहे. पर्यटकही त्याचा आनंद घेत आहेत.
 
माथेरानमध्ये वेगवेगळी 38 प्रेक्षणीयस्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्गसौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील चिक्की, मध, घोड्याची रपेट, हातरिक्षा सवारी, प्रेक्षणीय स्थळावरील मनोरंजनासाठी गेम्सची मजा, गोळा, मका मॅगी अशा अनेक खाद्यपदार्थांची लज्जत येथे फिरण्याबरोबर पर्यटकांना घेता येते. येथील महत्त्वाचे आकर्षण असलेली माथेरानची राणी म्हणजे मिनी ट्रेन अतिवृष्टीच्या काळात काही महिन्यांसाठी बंद झाली असली तरी येथील निसर्गाच्या सान्निध्यात पायी चालण्याचा आनंद काही औरच असला तरी मिनी ट्रेनची सफर करण्यासाठी आम्ही पुन्हा माथेरानला येणार, असा विश्‍वास पर्यटक व्यक्त करत होते. 

आम्ही माथेरानमध्ये येताच कधीच न दिसणारे लाल मातीचे रस्ते, रस्त्यावरून चालणारे घोडे याचा आनंद घेतला. रस्त्याच्या बाजूला घनदाट जंगल आणि त्या जंगलातील माकडे हे दृश्‍य डोळ्यात साठवण्यासारखे वाटत होते. 
- सुवर्णा सोनार, पर्यटक, जळगाव 

माथेरान हे मुंबईपासून प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ आहे. येथील वातावरण अतिशय थंड आहे. त्यामुळे कितीही चालले तरी घाम येत नाही. येथील घोड्यावर फिरण्याची मजा औरच आहे. माथेरान हे सर्व पर्यटनस्थळांपेक्षा वेगळे असल्यामुळे आम्हाला खूप आवडले. मिनी ट्रेन बंद असल्यामुळे थोडा नाराज झालो होतो; पण येथील निसर्ग पाहून माझी नाराजी दूर झाली. 
- एव्हियर गोन्सालवीस, पर्यटक, मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue