ऐनदिवाळीत "एफडीए' सुशेगाद 

महेंद्र दुसार
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

णपतीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 60 दुकानांवर कारवाई झालेली आहे. दिवाळीच्या सणात अन्न भेसळीच्या तक्रारी जास्त असतात; परंतु जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाने एकाही दुकानदारावर कारवाई केली नाही.

अलिबागः दिवाळीच्या दिवसात दूध, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते; मात्र काही लोक पैशांच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत ही भेसळ रोखण्याची जबाबदारी ज्या अन्न आणि औषध प्रशासनावर आहे त्या विभागातील अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. दिवाळीच्या दरम्यान एकाही व्यावसायिकावर या विभागामार्फत कारवाई झाली नाही.
 
गणपतीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 60 दुकानांवर कारवाई झालेली आहे. दिवाळीच्या सणात अन्न भेसळीच्या तक्रारी जास्त असतात; परंतु जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाने एकाही दुकानदारावर कारवाई केली नाही. अन्न भेसळ खात्याची कारवाई ही नेहमीच गुलदस्त्यात राहिली असून, कारवाईच्या नावाखाली मोठे अर्थकारण लपले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे. रायगड जिल्हा हा पर्यटनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ, शीतपेये, मांसाहारी पदार्थ, हवाबंद अन्नपदार्थ याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते; मात्र भेसळयुक्त अन्नपदार्थ मिळत असल्याने ग्राहकांची फसवणूक होऊन फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हॉटेल, ऑईल मिल, डेअरी, किराणा धान्य दुकानदार, स्वीटमार्ट यांच्या दुकानात सर्रास भेसळ अथवा कमी दर्जाचे पदार्थ हे भरमसाठ किमतीला विकले जात असतात.

ग्राहकाला मात्र अव्वाच्या सव्वा दाम मोजूनही हलक्‍या दर्जाचे पदार्थ नाईलाजाने खरेदी करावे लागतात; परंतु अन्नभेसळ नियंत्रण करणारा विभाग हातावर हात ठेवून बसल्याने अशा भेसळ करणाऱ्यांचे फावले असून, एक ठराविक रक्कम दरमहा चिरीमिरी म्हणून देण्याची पद्धत रुजू झाल्याची चर्चा सुजाण नागरिक करीत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या मानांकनानुसार अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यात येते. जर एखादा व्यापारी भेसळयुक्त पदार्थ विकत असेल, तर त्याच्यावर कठोर शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व औषध प्रशासन सपशेल अपयशी ठरला आहे. यामुळे भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. 

टोल फ्रीकडे दुर्लक्ष 
अन्नातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारने 1800222365 टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे; मात्र या क्रमांकावर तक्रार करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते. अनेक वेळेला या तक्रारींकडे पेण येथील कार्यालयातील कर्मचारी दुर्लक्ष करीत असतात. यामुळे सामान्य नागरिक तक्रारी करण्यापासून दुरावले आहेत. 

मिठाईची चव खराब असल्यास दुकानदाराला जाब विचारल्यावर दुकानदार तुम्हाला कोठे तक्रार करायची आहे, तिथे तक्रार करा, अशी अरेरावीची उत्तरे देत असतात. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार करूनही वेळेत लक्ष दिले जात नाही. 
- सिद्धार्थ पाटील, 
ग्राहक, अलिबाग 

रायगडमध्ये फक्त सहा अन्न निरीक्षक आहेत. पूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी ही संख्या खूपच कमी पडत आहे. 25 ऑक्‍टोबरपर्यंत सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात होते. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्या. त्यामुळे कारवाई करता आली नाही. 
- लक्ष्मण दराडे, 
अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी 

गणपतीपासून झालेल्या कारवाई 
खवा, मावा- 2 नमुने 
खाद्यतेल- 12 नमुने 
मिठाई- 27 नमुने 
रवा/आटा/मैदा- 19 
-------------- 
एकूण - 60 
------------ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue