किल्ले जंजिऱ्याला प्रतीक्षा जेट्टीची! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

जंजिरा किल्ल्यात प्रवेशद्वाराजवळ विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची होडीतून उतरताना होणारी दमछाक थांबविली पाहिजे. सुलभरीत्या शिडाच्या होड्यांमधून किल्ले दर्शनासाठी जाताना तरंगत्या जेट्टीची मागणी होत आहे.

मुरूडः राज्यभरातील पर्यटकांची मोठ्या संख्येने वर्दळ असलेल्या जंजिरा किल्ल्यावर तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा कायम असून, गेली अनेक वर्षे मागणी करूनही त्याची पूर्तता होत नसल्याने पर्यटक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यटक आणि ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.
 
जंजिरा किल्ल्यात प्रवेशद्वाराजवळ विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची होडीतून उतरताना होणारी दमछाक थांबविली पाहिजे. सुलभरीत्या शिडाच्या होड्यांमधून किल्ले दर्शनासाठी जाताना तरंगत्या जेट्टीची मागणी होत आहे. भरती-ओहोटीदरम्यान लाटांच्या माऱ्यामुळे होडी कलंडण्याची शक्‍यता असते. यासाठी होडीवरील कामगारांना प्रवाशांची काळजी म्हणून खूपच सतर्क राहावे लागते. जंजिऱ्यात दाखल होत असलेल्या हौशी पर्यटकांमध्ये लहान बालके व महिलांचा अधिक भरणा असतो. तेव्हा होडीतून उतरताना दुखापत न होता किल्ले दर्शनाचा आनंद देण्यासाठी मंजूर झालेली तरंगती जेट्टी पुरातत्त्व विभागाने ठेकेदाराकडून लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा असून, गेली अनेक वर्षे ही मागणी मंजूर होत नसल्याने अनेक पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मेरिटाईम बोर्ड अधिकारी संपर्क क्षेत्रात नसल्याने संभाषण होऊ शकले नाही. 

जंजिरा किल्ल्यावर तरंगती जेट्टी बांधण्याची अनुमती पुरातत्त्व खात्याने दिलेली आहे. ही जेट्टी उभारण्याचे काम महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे आहे. या कामासाठी लागणारा अपेक्षित निधी मेरिटाईम बोर्डाकडे वर्ग झाला आहे. 
- बजरंग येलीकर, पुरातत्त्व अधिकारी, मुरूड 

जंजिरा किल्ल्यात जावेसे वाटले ते छत्रपती संभाजी महाराज मालिकेमुळे. त्याप्रमाणे आम्ही किल्ला पाहण्यासाठी आलो; मात्र बोटीतील हेलकावे जीवघेणे वाटतात. प्रवेशद्वाराजवळ उतरताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा जीवावर बेतण्याची भीती आहे. त्यामुळे येथे सरकारने जटीची सोय करावी. 
- कमल बळीराम बागुल, ज्येष्ठ नागरिक, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue