पोलादपूरमध्ये हंडाभर पाण्यासाठी पायपीट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पोलादपूर : पळचिल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील हुंबारकरवाडीजवळ विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने एक महिन्यापासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. त्यामुळे परिसरातील सावरीचीवाडी, सातपाणेवाडी आणि हुंबारकरवाडी येथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर डोंगर-दरीकपारीत खोल उतरून विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते नामदेव शेलार व ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीकडे लेखी तक्रार करूनही अद्याप वीज रोहित्राची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. 
या वाडी वस्तीवरील तरुण रोजगारानिमित्त मुंबई, पुणे येथे स्थायिक झाल्याने वाडीवर फक्त वयोवृद्ध ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. त्यामुळे वृद्धांना दरीतून डोक्‍यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे पाणी आणताना रस्त्यावरून पाय घसरून पडल्यास त्यांचा हात, पाय मोडण्याची शक्‍यता नामदेव शेलार यांनी व्यक्त केली.

याबाबत वीज वितरणचे अधिकारी कुंदे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबतचा अहवाल गोरेगाव विभागाला पाठविला असून लवकरच नवीन रोहित्र बसविण्यात येईल. मात्र गोरेगाव येथे ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र नसल्याने अडचण येत आहे. त्यामुळे रोहित्र बसविण्याचे काम रखडले आहे. मात्र हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue