ताडवाडी-मोरेवाडीची पाणी योजना कागदावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

पाथरज ग्रामपंचायतीमधील सात पाड्यांची बनलेली ताडवाडी ही कर्जत तालुक्‍यातील मोठी आदिवासी वाडी समजली जाते. त्या शेजारी असलेली मोरेवाडी हीदेखील ताडवाडीच्या विहिरीवर अवलंबून आहे. त्या दोन्ही आदिवासी वाड्यांमधील महिलांना जानेवारीपासून रात्र विहिरीवर काढावी लागते.

नेरळः कर्जत तालुक्‍यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी आणि मोरेवाडीमध्ये पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्या दोन्ही वाड्यांसाठी पावसाळ्यापूर्वी नळ-पाणी योजना कार्यान्वित करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्‍टोबर 2017 मध्ये दिले होते. त्यानंतर या ठिकाणी गेल्या वर्षी जिल्हा परिषदेने नळ-पाणी योजना मंजूर केली होती; मात्र ही योजना आजही कागदावरच आहे. डिसेंबर 2017 मध्ये या नळ-पाणी योजनेची घोषणा जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने केली होती. दरम्यान, योजनेचा उद्‌भव कुठे असावा यासाठी या दोन्ही टंचाईग्रस्त गावांची नळपाणी योजना रखडली असून, येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोक्‍यावर हंडे घेऊन जावे लागत आहे.
 
पाथरज ग्रामपंचायतीमधील सात पाड्यांची बनलेली ताडवाडी ही कर्जत तालुक्‍यातील मोठी आदिवासी वाडी समजली जाते. त्या शेजारी असलेली मोरेवाडी हीदेखील ताडवाडीच्या विहिरीवर अवलंबून आहे. त्या दोन्ही आदिवासी वाड्यांमधील महिलांना जानेवारीपासून रात्र विहिरीवर काढावी लागते. गेल्या वर्षी त्याबाबत माध्यमांनी दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेला सूचित केल्यानंतर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने 27 लाख रुपयांची तरतूद दुरुस्तीसाठी केली होती; मात्र स्थानिकांनी आम्हाला दुरुस्ती नाही तर नवीन पाणी योजना पाहिजे. त्या योजनेचा उद्‌भव हा बांगरवाडी मातीच्या बंधाऱ्याचा असावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने त्या ठिकाणी नळपाणी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या 27 लाखांचा निधी थांबवून ठेवला. जानेवारी 2018मध्ये अंदाजपत्रक तयार करताना नवीन योजना ही बनगरवाडी येथे असलेल्या मातीच्या बंधाऱ्यातील उद्‌भव निश्‍चित करण्यात आला. त्यासाठी नव्याने तयार झालेले अंदाजपत्रक हे एप्रिल 2018 मंजूर झाले नाही.

त्या वेळी नव्याने केलेले अंदाजपत्रक 67 लाखांचे बनले होते; मात्र बांगरवाडीतील मातीचा बंधारा जुना असून, पाण्याचा काही भरोसा नसल्याने आमसभेत त्यावर पुन्हा चर्चा झाली आणि मोरेवाडी तसेच ताडवाडीसाठी नळपाणी योजना करताना ती डोंगरपाडा येथील पाझर तलावाच्या पाण्यावर करण्याची सूचना आमदार सुरेश लाड यांनी केली. आता 93 लाख रुपयांचे नवीन अंदाजपत्रक तयार झाले आहे. ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचे निश्‍चित झाले आहे. दोन्ही वाडीतील लोकांसाठीच्या विहिरी कोरड्या पाडण्याच्या मार्गावर आहेत. 

बांगरवाडीतील मातीचा बंधारा सरकारचा नाही. त्यात त्या बंधाऱ्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे पहिल्यापासून मागणी असलेली डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळ-पाणी योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक आल्याने योजनेला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती. आता त्या कामांना गती मिळाली आहे. योजना महिनाभरात सुरू होईल. 
- रेखा दिसले, सदस्य, जिल्हा परिषद 

ताडवाडी, मोरेवाडीतील नळ-पाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर आहे; मात्र स्थानिकांनी उद्‌भव बदलण्याची सूचना केल्याने सर्व अंदाजपत्रक नव्याने करायची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. 
- डी. आर. कांबळे, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue