सुपारी कोळेरोगाच्या कचाट्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

रेवदंडा ः अतिवृष्टी, कोळेरोगाच्या कचाट्यात सुपारी सापडली असून, यामुळे बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी पंचनामे दूरच राहिले, निदान बागांची पाहणी तरी करा, अशी विनवणी बागायतदारांकडून केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका अलिबाग तालुक्‍यातील चौल-रेवदंडामधील बागायतदारांना बसला आहे. सुपारीच्या होत असलेल्या गळतीने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

रेवदंडा ः अतिवृष्टी, कोळेरोगाच्या कचाट्यात सुपारी सापडली असून, यामुळे बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी पंचनामे दूरच राहिले, निदान बागांची पाहणी तरी करा, अशी विनवणी बागायतदारांकडून केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका अलिबाग तालुक्‍यातील चौल-रेवदंडामधील बागायतदारांना बसला आहे. सुपारीच्या होत असलेल्या गळतीने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

रायगड जिल्ह्यात सुपारी बागायतदारांची संख्‍या मोठी आहे. येथील सुपारी आकाराने मोठी असल्याने तिला मागणीही जास्त आहे. सुपारी हे मेहनतीने मिळणारे फळ आहे. यासाठी बागायतदारांना जीव तोडून मेहनत करावी लागते. साधारण मे महिन्यानंतर फळधारणेला सुरुवात होते. त्यानंतर त्यावर रोग लागू नये यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. 

ऑगस्टनंतर सुपारीच्या फळांना रंग येण्यास सुरुवात होते. सप्टेंबरच्या अखेरीस सुपारी काढण्यास सुरुवात होते; मात्र या वर्षी अतिवृष्टी आणि कडक ऊन न पडल्याने सुपारीस चिकटपणा येऊन त्यांची मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागली. परिणामी बागायतींमध्ये सुपारीचा खच पडला आहे.

तालुक्‍यातील चौल, नागाव, आक्षी, रेवदंडा; तर मुरुड-जंजिरा तालुक्‍यातील भुईघर व नांदगाव भागात सुपारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर अनेक बागायतदारांचा उदरनिर्वाह चालतो; मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत सुपारीवरील कोळेरोगाने बागायतदारांना हैराण केले असून, यावर उपाय करूनही काहीच परिणाम होत नसल्याने बागायतदार वैतागले आहेत.

तोंड उघडल्यागत पडलेली सुपारी पाहून बागायतदार मेटाकुटीला आहे. वर्षभर केलेली मेहनत आणि खर्च वाया गेल्याने आता दाद कोणाकडे मागायची या प्रतीक्षेत बागायतदार आहे. जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान झाल्यानंतर सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जाऊन पाहणी केली. त्यानंतर काही ठिकाणचे पंचनामेही झाले; मात्र सुपारी बागायतदारांकडे पाहायला वेळ नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

सुपारी पिकाचे उत्पन्न घेताना वीजबिल, विविध प्रकारची खते, मजुरी यांचा खर्च लक्षात घेता बागायतदारांना सुपारी पिकातून फारसा लाभ मिळत नाही. यात नुकसानीचा फटका बसत असल्याने आर्थिक गणितच बिघडून जाते. त्यामुळे सरकार ऊस, कापूस, द्राक्षे यांसारख्या पिकांना जसा दर देते, त्या धर्तीवर सुपारीलाही देणे आवश्‍यक आहे, अशी मागणी चौल घरत आळीमधील सुपारी बागायतदार विकास घरत यांनी केली आहे. 

सुपारी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे वादळी-वारा यांनी झाडांचे नुकसान झाल्यास केले जातात. सध्या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
- वसंत भुरे, कृषी सहायक, चौल-उत्तर

सरकारने आतातरी आमच्या व्यथा जाणून घ्याव्यात. सुपारीचे ऐवढे मोठे नुकसान होऊनही कोणीही दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे आता उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आता तरी व्यथा जाणून घेऊन भरपाई द्यावी.
- आदेश नाईक, आदर्श शेतकरी, चौल-नारायण तळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue