पर्यटकांना समुद्रात पोहण्यास मनाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अलिबाग ः "महा'चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने उंच लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून पर्यटकांनाही समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. 

अलिबाग ः "महा'चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावरील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. समुद्र खवळलेला असल्याने उंच लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून पर्यटकांनाही समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या बंदीच्या आदेशानंतर काशीद, किहीम येथील समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांनी स्वतःहून पुढाकार घेत दुकाने बंद ठेवली आहेत; तर वरसोली, अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर काही प्रमाणात दुकाने सुरू होती. या समुद्रकिनाऱ्यांवर बंदीला न जुमानता पाण्यातील खेळ सुरूच आहेत. अखेर गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दखल घेत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत रायगडसह कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्‍यता वर्तविली आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यात अतिगंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नसली तरीही नागरिकांनी सुरक्षिततेचा विचार करून सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

वादळामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. पर्यटकांसाठी पाण्याचे खेळ बंद करण्यात यावेत, समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात पोहण्यासाठी धाडसाने उतरू नये, ढगांच्या कडकडाटात वीज पडण्याची शक्‍यता असल्याने झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ, ओल्या जागेवर थांबू नका. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वेगाने वारे वाहणे आणि अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत आवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडा. समुद्रकिनाऱ्यावरील कच्च्या घरातील नागरिकांनी योग्य वेळीच सुरक्षित ठिकाणी जाऊन आश्रय घ्यावा. अफवांवर विश्‍वास ठेवू नये. वादळाबाबत अधिकृतपणे जाहीर माहिती घ्यावी, यासह काही महत्त्वाच्या सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 

वादळाचा प्रभाव दिसत नसला तरी अतिगंभीर स्थिती निर्माण होवून कोणताही जीवित किंवा वित्त हानी होवू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. 
डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue