पोषक वातावरणामुळे मेंढपाळ स्थिरावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

मांडवा, झिराड, मापगा, मुनवली अशा गावांत मेंढपाळ त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहू लागले आहेत. त्यामुळे त्यांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास वाचला आहे. 

अलिबागः पूर्वी शेकडो किलोमीटरची पायपीट करून संसाराचा गाढा सोबत घेऊन घाटमाथ्यावरील मेंढपाळ रायगड जिल्ह्यात यायचे. मेंढरे, बकऱ्यांना हिरवागार चारा मिळावा यासाठी त्यांचे पावसाळ्यानंतर जिल्ह्यात आगमन व्हायचे; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या मेंढपाळांनी जिल्ह्यात ग्रामीण भागात पोषक वातावरणामुळे कायमस्वरूपी ठाण मांडल्याचे चित्र आहे.
 
जिल्ह्यात वर्षभर हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. त्या तुलनेत घाटमाथ्यावर याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मेंढपाळांचे हंगामी स्थलांतर ठरलेले होते. बकऱ्या, मेढरे यांना पावसाळा संपल्यानंतर हिरवा चारा मिळत नसे. त्यामुळे पुणे, सातारा परिसरातील मेंढपाळ दिवाळी झाल्यावर संसाराचा गाढा घोड्यावर घेऊन मेंढ्या, बकऱ्यांसमवेत ठिकठिकाणी वस्ती करीत रायगडमध्ये स्थलांतर करीत असत. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत असताना मेंढपाळांसह त्यांच्या कुटुंबीयांना तारेवरची कसरत करावी लागत असे. पिढ्यान्‌पिढ्या मेंढपाळ बकऱ्यांसह हिरव्या चाऱ्यासाठी पायपीट करीत. यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रासही होतो. बकऱ्या, मेंढ्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेसह आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर होत असे; मात्र गेल्या पाच वर्षांत मेंढपाळांनी रायगडमध्ये कायमचा तळ ठोकला आहे. मांडवा, झिराड, मापगा, मुनवली अशा गावांत मेंढपाळ त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहू लागले आहेत. त्यामुळे त्यांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास वाचला आहे. 

लहानपणापासून वडिलांसोबत आम्ही रायगडमध्ये दिवाळी झाल्यावर स्थलांतर करीत होतो. या ठिकाणी हिरवा चारा असल्याने मेंढ्या व बकऱ्यांना त्याचा फायदा होत असे. त्यामुळे याच ठिकाणी राहून रोजगाराचे साधन मिळविण्याबरोबरच मेंढ्या व बकऱ्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. हे वातावरण पोषक असून, या वातावरणात आता रमू लागलो आहोत. 
- खंडू पांडू कोकरे, मेंढपाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue