धाकट्या पंढरीत भक्‍तांचा मेळा 

खोपोली : विठ्ठल-रखुमाईची पाटील दाम्‍पत्‍याने विधिवत महापूजा केली.
खोपोली : विठ्ठल-रखुमाईची पाटील दाम्‍पत्‍याने विधिवत महापूजा केली.

खालापूर / खोपोली ः जगद्‌गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाकटी पंढरी ताकई (साजगाव) यात्रा सोहळ्यास शुक्रवारी प्रारंभ झाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्ताने शुक्रवारी पहाटे 5 वाजता विठ्ठल-रखुमाईची महापूजा खानाव येथील हभप देविदास शिवराम पाटील यांच्या कुटुंबाच्या हस्ते पार पडली. शुक्रवारी पहाटेपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी रांग लागली होती. रायगड जिल्ह्यातील दाखल झालेल्या दिंड्या, खालापूर, खोपोलीतील हजारो वारकरी व भाविकांनी ग्यानबा तुकाराम व विठ्ठलाच्या जयघोषात माऊलीचे दर्शन घेतले. 

कोकणातील धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताकई येथे निसर्गरम्य ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर आहे. येथे भरणाऱ्या मोठ्या यात्रेमुळे महाराष्ट्रात हे मंदिर प्रसिद्ध आहे. कार्तिकी एकादशीपासून येथे पंधरा दिवस चालणारी कोकणातील सर्वात मोठी यात्रा भरते. मंदिरातील सेवा करण्याचा मान माजी राज्यमंत्री तसेच विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार करणारे स्व. बी. एल. पाटील यांच्या घराण्याला मिळाला आहे. 

कार्तिकी एकदशीच्या आदल्या दिवशी, माऊलीच्या पादुकांचे पालखीने आगमन झाले. विठ्ठल-रुखमाईच्या मुकुट, पादुकांची पालखी गुरुवारी ताकई गावातून काढण्यात आली होती. हभप रामदास महाराज कर्णूक यांच्या कीर्तनानंतर पालखीचे घरोघरी महिलांनी आरती करून स्वागत केले. त्यानंतर गावाला प्रदक्षिणा घातल्यावर रात्री 2 वाजता पालखीचे भजनाच्या गजरात मंदिराकडे प्रस्थान झाले. खानाव गावातील शेतकरी कुटुंबातील हभप देविदास शिवराम पाटील यांच्या कुटुंबाने विधीवत महापूजा केली. विविध भागांतून आलेल्या भक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. 

बैल बाजार, सुकी मासळीसाठी प्रसिद्ध 
कोकणातील एकमेव मोठी यात्रा असल्याने ताकई, साजगाव यात्रेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यात्रेतील बैल बाजार व सर्व प्रकारच्या सुकी मासळीचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेत सुमारे 100च्या आसपास सुकी मासळी आणि मिठाईची दुकाने आहेत. तसेच घाटावरून कडधान्य, कांदा-बटाटा-मिरची विकण्यासाठी येथे मोठ्या संख्येने व्यापारी येतात. भव्य आकाशपाळणे, खेळणी, कपड्याचा बाजार व यात्रेतील जिलेबी महाराष्ट्रात प्रसिद्ध असून 15 दिवस ही यात्रा भरते. यावेळी कोट्यवधींची उलाढाल होते. खोपोली नगरपालिकेच्या वतीने यात्रेचे नियोजन करण्यात येते. खोपोली नगरपालिकेकडून पाणी, स्वच्छता व विजेची व्यवस्था करण्यात येते. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त 
पेण, अलिबाग, सुधागड, पनवेल, कर्जत, खालापूर तालुक्‍यांसह खोपोली शहरात शुक्रवार सकाळपासून दिंड्या येत आहेत. महाराष्ट्रातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था विठोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव नारायण पाटील, जयवंत पाटील, ऍड. रामदास पाटील, व्यवस्थापक मारुती पाटील यांनी केली आहे. यात्रेत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार व वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी खालापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com