साजगाव यात्रेकरूंचा खरेदीसाठी आखडता हात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

ही यात्रा सलग 15 दिवस चालते. शुक्रवारपासून (ता. 8) यात्रेला प्रारंभ झाला. रायगड जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, पुणे आणि राज्यभरातून लाखो यात्रेकरून याचा लाभ घेतात. संसारोपयोगी साहित्य व सुक्‍या मासळीची या दरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदी होते.

खोपोलीः "धाकटी पंढरी' अर्थात साजगाव-ताकईतील "बोंबल्या विठ्ठल यात्रे'स कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ झाला. शनिवार व रविवारी सुटीचा दिवस आणि औद्योगिक क्षेत्रातील पगारी तारखांचे दिवस असल्याने यात्रेकरूंची गर्दी होऊन उलाढाल वाढेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती; मात्र यात्रेकरू दाखल होण्यास प्रारंभ झाला असली तरी खरेदीसाठी त्यांनी आखडता हात घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे ही सुरुवात असल्याने आगामी काही दिवसांत ही उलाढाल वाढेल, अशी अपेक्षा या वेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
 
ही यात्रा सलग 15 दिवस चालते. शुक्रवारपासून (ता. 8) यात्रेला प्रारंभ झाला. रायगड जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, पुणे आणि राज्यभरातून लाखो यात्रेकरून याचा लाभ घेतात. संसारोपयोगी साहित्य व सुक्‍या मासळीची या दरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मिठाई, बैल व सुकी मासळी बाजार हे या यात्रेचे आकर्षण असते. यातून कोट्यवधीची उलाढाल होते; मात्र पहिल्या आठवड्यात यात्रेतील खरेदी-विक्री व मनोरंजनासह विविध खेळांचा व्यवसाय व आर्थिक उलाढाल काहीशी निराशा देणारी राहिल्याने व्यापाऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे; मात्र येत्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात यात्रेकरूंची गर्दी होऊन आर्थिक उलाढाल होण्याची आशा व्यापाऱ्यांमध्ये कायम आहे.

घरगुती वापराच्या वस्तू, कपडे व उबदार कपडे, सुकी मासळी, जिलेबी, मिठाई, खेळणी, सौंदर्यप्रसाधने आदींनी शेकडो दुकाने सजली आहेत. मनोरंजन, चित्तथरारक उंच पाळणे, मौत का कुंवासह रोमहर्षक खेळ यात्रेत आहेत. पारंपरिक शेतीसाठीचे साहित्य, बैल येथील बैल बाजारात विक्रीकरिता दाखल झाले आहेत. दरम्यान, दुकाने साहित्याने सजली असली तरी पहिल्या शनिवार, रविवारी मात्र यात्रेकरूंनी खरेदीसाठी ऐवढा उत्साह दाखवला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी हे दोन्ही दिवस व्यापारीदृष्ट्या निरुत्साह देणारे ठरले. 

दुकाने सजली 
खेळणी व सौंदर्यप्रसाधने- 28 दुकाने 
घरगुती वापराचे साहित्य- 18 दुकाने 
सर्व प्रकारचे कपडे- 32 दुकाने 
किरकोळ विक्री- 16 दुकाने 
विविध प्रकारची मिठाई- 26 दुकाने 
सुकी मासळी विक्री- 27 दुकाने 
घोंगड्या व उबदार कपडे विक्री - 7 दुकाने 

साजगाव यात्रेतील पहिला आठवडा आर्थिक बाबतीत निराशा देणाराच असतो. येत्या आठवड्यात यात्रेकरूंची गर्दी वाढले. त्यामुळे व्यापाराला चालना मिळून उलाढालही वाढेल. 
- शैलेश आंबवणे, मिठाई व्यापारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue