ऋतुचक्रातील बदलांनी जलचरही संभ्रमावस्थेत?

संग्रहित
संग्रहित

रोहा ः दर वर्षी जून महिन्यात सुरू होणारा पावसाळा सप्टेंबरअखेर निरोप घेतो. त्याच वेळेस पावसाळा सुरू होताच येणारे बेडूक, खेकडे, पाणसाप, कासव व गोगलगाई जमिनीखाली जाऊन बसतात; मात्र या वर्षी नोव्हेंबरमध्येही पाऊस सुरू असल्याने जलचर अजूनही जमिनीवरच दिसत आहेत. निसर्गचक्रातील या बदलांमुळे त्यांचाही गोंधळ उडाला नसेल तर नवल! याचा या प्राण्यांच्या जीवनचक्रावर परिणाम होण्याची शक्‍यता असून, त्याचा अभ्यास होण्याची गरज पर्यावरणवादी व्यक्त करीत आहेत.

दर वर्षी जून महिन्यात सुरू झालेला पावसाळा ऑगस्ट महिन्यात संपतो. पावसाळ्यानंतर पाण्याच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी तसेच उष्णतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी बऱ्याच जातीचे साप, पाली, सरडे तसेच बेडकांसारखे उभयचर, खेकडे, काही मासे, गोगलगाई, काही प्रजातींचे गांडूळ निद्रावस्थेत जातात. या प्रक्रियेत प्रत्येक प्राण्यात वेगवेगळे बदल घडतात. जसे गोगलगाय स्वतःभोवती द्रवरूप आवरण तयार करते. बेडूक तसेच सापांच्यात त्याची हालचाल मंदावते. त्‍यांची जैविक प्रक्रिया कमी होते. आतड्याचा आकार लहान होतो. थोडक्‍यात ते ऊर्जाबचत अवस्थेत जातात. काही झाडे (लिली वगैरे) निद्रावस्थेत जातात.

या वर्षी पावसाळा सुमारे दीड ते दोन महिने लांबला असून, समाधी अवस्थेत जाणारे प्राणी अजूनही क्रियाशील दिसत असल्याचे गिरीभ्रमण निसर्ग संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सप्रे यांनी सांगितले. या गोष्टींचा प्राण्यांच्या जीवनावर काहीतरी निश्‍चित परिणाम होणार असल्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. 

ओलावा व पाण्याची कमतरता व वाढते तापमान यामुळे निद्रावस्थेत जाणाऱ्या प्राण्यांना योग्य वातावरण मिळत असल्याने ते अजून जमिनीवरच आहेत. मात्र, पावसाळी वातावरण संपताच ते निद्रावस्थेत जातील. त्यांचा सक्रिय अवस्थेतील काळ वाढल्याने त्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होण्याची शक्‍यता कमी आहे. तरीही त्याचा अभ्यास करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत ऑर्गनायझेशन ऑफ वाईल्ड लाईफ स्टडीज या संस्थेचे सचिव कुणाल साळुंखे यांनी व्यक्त केले.

दीर्घकालीन पावसाळ्याचा निसर्गावर परिणाम होणे साहजिकच आहे. ४ महिने सक्रिय व ८ महिने निष्क्रिय अवस्थेत असणाऱ्या प्राण्यांवर सक्रिय अवस्था वाढल्यास काय परिणाम होतो, हे पाहणे कुतूहलाचा विषय आहे; मात्र अशी परिस्थिती क्वचित निर्माण होत असल्याने होणारे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम तात्पुरते असतील; परंतु निसर्गात अशी वारंवार परिस्थिती निर्माण झाल्यास कायमस्वरूपी किंवा दीर्घकालीन परिणाम दिसण्याची शक्‍यता आहे. त्याच्या नोंदी घेऊन अभ्यास सुरू करण्याची आवश्‍यकता आहे.
- नागेश शिंदे, पर्यावरण अभ्यासक

दीर्घकाळ रेंगाळलेला पावसाळा ही क्वचित निर्माण होणारी परिस्थिती आहे. पावसाळ्यात सक्रिय असणाऱ्या प्राण्यांसाठी अजूनही पावसाळा असल्याने ते जमिनीवर दिसत आहेत. पाऊस पडायचा थांबताच ते जमिनीखाली जाऊन  समाधीत जातील. या गोष्टींचा नेमका परिणाम सांगण्यासाठी अनेक वर्षांसारख्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल.
- राहुल खोत, सहायक संचालक, मुंबई निसर्ग इतिहास संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com