अलिबागमध्‍ये पाणीबाणी!

अलिबाग : जलपाडा येथील जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करताना एमआयडीसीचे कर्मचारी.
अलिबाग : जलपाडा येथील जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करताना एमआयडीसीचे कर्मचारी.

अलिबाग : अलिबाग तालुक्‍यात जलपाडा येथील जलकुंभातून एमआयडीसीमार्फत अलिबाग शहरासह साठ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने दुरुस्तीचे काम बुधवारी सकाळपासून सुरू करण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे अलिबागसह 60 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हे काम बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाण्याअभावी नागरिकांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. 

जलपाडा येथील जलकुंभाद्वारे एमआयडीसीमार्फत संपूर्ण अलिबाग शहर, खानाव, बामणगाव, बेलकडे, कुरुळ, वरसोली, चेंढरे, पेझारी यासह 60 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या जलकुंभामध्ये 20 हजार घनमीटर इतक्‍या क्षमतेने पाणी साठवण केले जाते. या जलकुंभातील जुना पाण्याचा व्हॉल्व्ह खराब झाला आहे. त्यामुळे एमआयडीसीमार्फत बुधवारी सकाळपासून जलवाहिनीचा व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. शहरासह काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना विहिरीतून पाणी आणावे लागले. 

एमआयडीसीमार्फत वारंवार दुरुस्तीची कामे केली जातात. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. ही गंभीर समस्या आहे. व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा दुरुस्तीचे काम एमआयडीसीने सुरू केले आहे. परंतु त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे अलिबागमधील किशोर अनुभवणे यांनी सांगितले. 

एमआयडीसीचे पाणी गावात पोहचत नाही. एमआयडीसी शटडाऊन करण्याबाबत कोणतीही सूचना देत नाही. त्यामुळे नियोजन करणे कठीण होत आहे. बुधवारी पुरेसे पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागल्याचे बेलकडे येथील माजी सरपंच संतोष पाटील यांनी सांगितले. 

जलपाडा येथील एमआयडीसीच्या जलकुंभाजवळील व्हॉल्व्ह खराब झाल्याने सकाळपासून दुरुस्ती सुरू केली आहे. जलकुंभ खाली करून जुने व्हॉल्व्ह काढून नवीन व्हॉल्व्ह टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये पाणीगळती झाल्याने त्याचीही दुरुस्ती सुरू आहे. रात्री दहा वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार नाही. 
- निशांत पाटील, कनिष्ठ अभियंता, एमआयडीसी. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com