मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास धोक्‍याचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

महाड : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला पावसाळ्यानंतर पुन्हा सुरवात झाली आहे. महामार्गावर डोंगर भागात धोकादायक स्थितीत कामे सुरू असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी दगडी टेकडीचे खोदकाम करताना संरक्षक यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. याबाबत वाहनचालक आणि नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर तात्पुरते पत्रे लावण्यात आले आहेत; मात्र तरीही आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने महामार्गावरील प्रवास धोक्‍याचा झाला आहे. 

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम इंदापूर ते कशेडीदरम्यान सुरू आहे. इंदापूर ते कशेडी या दरम्यान तीन विविध भागात तीन बांधकाम कंत्राटदार कंपन्या काम करत आहेत. कशेडी घाट, महाडजवळ नडगाव ते हॉटेल विसावा, केंबुर्ली, या दरम्यान महामार्गालगत छोट्या-छोट्या टेकड्या आणि डोंगर आहेत. पावसाळ्यात केंबुर्ली व नडगाव येथे रस्त्यावर दरडही आलेली होती. या ठिकाणी खडक फोडून रस्ता तयार केला जात आहे.

पावसाळ्यापूर्वी नडगावजवळ दगडी टेकडीचे खोदकाम करतानादेखील अशाच प्रकारे सरंक्षक यंत्रणा उभी केली नव्हती. याबाबत तक्रार झाल्यानंतर तात्पुरते पत्रे उभे करण्यात आले. आता पावसाळ्यानंतर पुन्हा महामार्गाचे काम सुरू झाले आहे. यामध्ये केंबुर्ली गावाजवळील डोंगर फोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्याने या ठिकाणी काम करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. तसे असतानाही या ठिकाणीदेखील संरक्षक पत्रे उभे न करताच काम सुरू करण्यात आले आहे. शिवाय महामार्गाच्या कामावर लक्ष ठेवणाऱ्या एका खासगी कंपनीचे आणि सार्वजनिक महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीदेखील दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचे काम करताना आवश्‍यक खबरदारी घेण्याची आवश्‍यकता असल्याचे वाहनचालक रणजीत नवगरे यांनी सांगितले. 

अपघाताची शक्‍यता 
केंबुर्ली गावापुढे एका बाजूला नदी पात्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. याठिकाणी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वरील बाजूने खोदकाम सुरू आहे. तीव्र उतार असल्याने खोदकाम करताना एखादा दगड थेट महामार्गावर येऊन पडू शकतो. अशा वेळी अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. या ठिकाणी काम करताना कोणत्याच प्रकारची काळजी सार्वजनिक बांधकाम कंपनीने घेतलेली नाही. पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी असुरक्षितपणे विजेच्या खांबाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात विजेचे खांब पडून या परिसरातील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली होती. याबाबत महामार्ग बांधकाम विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue