नागरी वस्तीत बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

अलिबाग : खालापूर तालुक्‍यातील नावंढे गावात ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी असतानाच मुरूड तालुक्‍यात नांदगाव समुद्रकिनारी वाळूवर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे नांदगाव, सुपे, मजगाव, आदाड यासह ८ ते १० गावांमधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अलिबाग : खालापूर तालुक्‍यातील नावंढे गावात ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी असतानाच मुरूड तालुक्‍यात नांदगाव समुद्रकिनारी वाळूवर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे नांदगाव, सुपे, मजगाव, आदाड यासह ८ ते १० गावांमधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

समुद्रकिनारी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे वन विभागही सतर्क झाला आहे. सुरक्षिततेसाठी येथील गावांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यासाठी वन विभागाने दवंडी पिटली आहे. तो बिबट्याच असल्याचा दुजोरा वन विभागाने दिला आहे.

नांदगावपासून हाकेच्या अंतरावर फणसाड अभयारण्य आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील माळी समाज मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस स्मशानभूमीलगत असलेल्या समुद्रकिनारी बिबट्या व छोट्या पिलाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने पंचक्रोशीत घबराट पसरली आहे.

नांदगाव समुद्रकिनारी सकाळी फेरफटका मारण्यास आलेल्या नागरिकांना त्याच्या पायाचे ठसे दिसले. या ठशावरून तो बिबट्या असण्याची शक्‍यता नांदगावचे माजी उपसरपंच राजेश साखरकर यांनी व्यक्‍त केली. त्यांनी तातडीने मुरूड वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली.

माहिती मिळताच प्रशांत पाटील आणि त्यांचे कर्मचारी नांदगाव समुद्रकिनारी आले. पाटील यांनी शैलेश दिवेकर, संजय गाणार यांच्या साह्याने पीओपीद्वारे ठशाचे नमुने घेतले. निरीक्षणावरून हे ठसे बिबट्याचे असल्याची शक्‍यता त्यांनी व्यक्‍त केली. सुरक्षिततेसाठी येथील गावांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दवंडी पिटली आहे. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पायाचे ठसे बिबट्याचेच आहेत. या प्रकरणी तपास प्रादेशिक वन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. बिबट्या हा फणसाड अभयारण्य हद्द सोडून प्रादेशिक वन विभागाच्या हद्दीत आला होता. 
- राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य 

बिबट्या रस्ता चुकल्याने समुद्रकिनारी आला असेल. मात्र, हे त्याच्या लक्षात येताच तो जंगलाकडे गेला आहे. कारण त्याच्या पावलांचे ठसे हे जंगल भागाकडे जाण्याचे सापडले आहेत. तरीही नांदगाव ग्रामपंचायतीला सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
- प्रशांत पाटील, वनक्षेत्रपाल, मुरूड वन विभाग

नांदगाव समुद्रकिनाऱ्यावर बुधवार व गुरुवारी बिबट्या व तिच्या लहान पिलांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील बिबट्याचा शोध घ्यावा अथवा या भागात रात्रीच्या वेळी भटके कुत्रे बांधून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्याची उपाययोजना करण्यात यावी.
- शांताराम वाघमारे, स्थानिक रहिवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue