माथेरानमध्‍ये विकासकामांना गती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

माथेरान : माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे विकासकामांसाठी बांधकाम साहित्य व यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एमएमआरडीएने माल वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर करण्याची परवानगी मागितली होती. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरती परवानगी दिल्यामुळे माथेरानमधील विकासकामांना गती मिळणार आहे. 

माथेरान : माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे विकासकामांसाठी बांधकाम साहित्य व यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एमएमआरडीएने माल वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर करण्याची परवानगी मागितली होती. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरती परवानगी दिल्यामुळे माथेरानमधील विकासकामांना गती मिळणार आहे. 

माथेरानमधील रस्ते व चार पॉईंटचे सुशोभीकरण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १२३ कोटी रुपयांचा निधी दिला; त्यामुळे या कामांना सुरुवात झाली. परंतु, वाहनांना बंदी असल्यामुळे यंत्रसामग्री नेण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करावा लागत होता. परिणामी ही कामे कासवगतीने सुरू होती. माल वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती एमएमआरडीएने १२ जुलैला पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबरला परवानगी दिली आहे. 

सरकारने ४ फेब्रुवारी २००३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले. दस्तुरी नाक्‍यापुढे मोटार वाहनांना बंदी असल्याने अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिका यांनाच परवानगी देण्यात आली. येथील विकासकामे संनियंत्रण समितीच्या मान्यतेने पूर्ण केली जातात.

विकासकामे करताना बांधकाम साहित्य हातगाडी, घोडा किंवा मजुरांना डोक्‍यावर वाहून न्यावे लागते. त्यामुळे विकासकामे करताना तारेवरची कसरत करावी लागते. 
एमएमआरडीएने जिल्हाधिकाऱ्यांकडे ट्रॅक्‍टरचा वापर करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार मुंबई येथील एन. ए. कन्स्ट्रक्‍शन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नासिर अली मद्रासवाला यांच्या अर्जाचा विचार करून काही अटी व शर्ती घालून ट्रॅक्‍टरद्वारे माल वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. 

पर्यटनाला मिळणार चालना
माथेरान परिसरात यावर्षी ७४७९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे रस्ते आणि काही प्रेक्षणीय स्थळांचे नुकसान झाले. त्यामुळे रस्त्यांची डागडुजी व पॉईंटच्या परिसरात सुशोभीकरण करण्याची मागणी होऊ लागली. ही विकासकामे झाल्यास पर्यटनाला चालना मिळू शकेल, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यानुसार विकासकामांसाठी आवश्‍यक साहित्य वाहनाने आणण्यास परवानगी देण्याची विनंती एमएमआरडीएने केली होती. संनियंत्रण समिती अस्तित्वात नसल्याने याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा लागला. त्यासंदर्भात उपवनसंरक्षकांकडून अभिप्राय मागवण्यात आला होता.

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी माथेरानमधील विकासकामांसाठी ट्रॅक्‍टरची परवानगी दिली आहे. त्यामुळे माथेरानच्या विकासाला चालना मिळेल.
- प्रसाद सावंत, सभापती, बांधकाम समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue