शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले 

संग्रहित
संग्रहित

अलिबाग : चार भिंतीआड विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यापेक्षा प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात नेण्यासाठी शैक्षणिक सहली आयोजन करण्याचे प्रत्येक शैक्षणिक संस्थांचे प्रयत्न असतात; मात्र या शैक्षणिक सहलींसाठी शिक्षण विभागाकडून अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता करण्यात मुख्याध्यापकांची दमछाक होत आहे. या जाचक अटींमुळे शैक्षणिक सहलींचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांवर आले आहे.  

तीन वर्षांपूर्वी मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पुण्यातील इनामदार महाविद्यालयातील 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर शिक्षण विभागाने सहलींच्या आयोजनात अटींची भलीमोठी यादीच तयार केली आहे. या अटींची पूर्तता करण्यात शिक्षण संस्थांची दमछाक होत आहे. सहलीला येणाऱ्या मुलांच्या सुरक्षेची पूर्ण हमी संबंधित संस्था किंवा मुख्याध्यापकांना घ्यावी लागते.

शाळेच्या सहली आयोजित करताना परवानगीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावे लागतात; मात्र हे प्रस्ताव पाठवताना शाळांना सुमारे 22 आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. डिसेंबर, जानेवारीत शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. 

रायगड जिल्ह्यातील गडकिल्ले, समुद्र किनाऱ्यांवरील जैवविविधता अभ्यासण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ येथील शाळांच्या शैक्षणिक सहली येथे येत असतात. सहलींवरील जाचक अटींमुळे शैक्षणिक सहलींचे हे प्रमाण 30 टक्‍क्‍यांवर आले आहे. पुन्हा मुरुडसारखी घटना घडू नये, यासाठी शिक्षण विभाग काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करीत आहे. शिक्षण विभाग, पोलिस प्रशासन, नेव्ही, पुरातत्व विभाग यांनी ही नियमावली तयार केली आहे. ही नियमावली व परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. 

सहलीसाठी येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांवर शिक्षकांना लक्ष ठेवणे शक्‍य नसते. काही विद्यार्थी शिक्षकांची नजर चुकवून अन्य विद्यार्थ्यांना घेऊन धोकादायक ठिकाणी जातात. त्यामुळे हुल्लडबाज विद्यार्थ्यांचा शिक्षकांना नेहमीच ताप असतो. सहलीसाठी गेलेला मुलगा-मुलगी सुरक्षितपणे घरी परतावेत, यासाठी नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही, याबाबत पालकही सतर्कता बाळगू लागले आहेत. मुलांबरोबर शिक्षकांची पुरेशी संख्या, मुलींबरोबरोबर महिला शिक्षक, निवासाची योग्य व्यवस्था याबद्दल पुरेशी खात्री झाल्यास पालकही आपल्या पाल्याला सहलीसाठी पाठविण्यास तयार असतात. 

आयोजनात नियमांचा अडसर 
शालेय अभ्यासक्रमातंर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असली तरी या अटी-शर्तीमुळे मुख्याध्यापकांचीच सहली आयोजनात उदासीनता दिसून येत आहे. नियमावलीतील कागदपत्रे शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केल्यानंतर सहलीसाठी परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुख्याध्यापकांना अडचणी येतात. 

या आहेत अटी-शर्ती 
सहलीच्या आयोजनासाठी शाळा समितीचा सहलीसाठीचा ठराव, सहलीचा जीआर, गटशिक्षणाधिकारी यांचे पत्र, एसटी आगरप्रमुखांसाठीचा अर्ज, त्यांची परवानगी, शिक्षण विस्तार अधिकारी, पालक संमतिपत्र, विद्यार्थी संमतिपत्र, सहलीत सहभागी विद्यार्थ्यांची यादी, सहभागी शिक्षक-पालक यांचे हजेरी पत्रक, सहल नियमावली, सहल नियोजन व ठिकाणे दर्शक नकाशा, सहल खर्च अंदाजपत्रक, प्रथमोपचार पेटी, सोबत असलेल्यांचे पत्र, विद्यार्थी ओळखपत्र, शिक्षक ओळखपत्र, विद्यार्थ्यांच्या साहित्याची यादी, शिक्षणाधिकारी यांचे परवानगी पत्र, सहल महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाणार नसल्याबाबतचे मुख्यध्यापकांचे हमीपत्र. 

विद्यार्थ्यांची सुरक्षा अति महत्वाची आहे. यासंदर्भातील पुरेशी हमी मिळाल्यानंतरच सहलींसाठी परवानगी दिली जाते. गेल्या तीन वर्षांत या नियमांमुळे सहलींच्या दुर्घटनांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. 
बी. एल. थोरात, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, रायगड जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com