रायगड जिल्ह्यात जलस्रोतांना नवसंजीवनी 

अलिबाग : मुरूड तालुक्‍यातील नागशेत येथील बंधाऱ्यात पाण्‍याच्‍या पातळीत वाढ झाली आहे.
अलिबाग : मुरूड तालुक्‍यातील नागशेत येथील बंधाऱ्यात पाण्‍याच्‍या पातळीत वाढ झाली आहे.

अलिबाग ः जलशक्ती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनेतून रायगड जिल्ह्यातील 10 हजार 464 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्‍यांमधील 22 ग्रामपंचायतींतील 58 महसुली गावांमध्ये हे अभियान राबवून 46 ठिकाणी बांधकामे करण्यात आली. याद्वारे जलस्रोतांचे मजबुतीकरण करण्यात आले. त्यासाठी 2 लाख 73 हजार 700 रुपये खर्च आला असून त्याचा लाभ 10 हजार 464 कुटुंबांना होणार आहे. या माध्यमातून 59 हजार 365 रोपांची लागवडही करण्यात आली आहे. 

पालघर आणि रायगड हे जलशक्ती अभियानातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील विकास प्रतिनिधींनी सामग्री अपुरी असूनही अभियान यशस्वी केले. त्यांना महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन आणि युनिसेफचे मार्गदर्शन मिळाले. जलशक्ती अभियानाच्या यशाबद्दलचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. नव्याने स्थापन झालेल्या मंत्रालयातील पेयजल आणि आरोग्य विभागाने जलशक्ती अभियान राबवून देशातील 256 जिल्ह्यांमधील 1592 गटांत पाणी वाचवून उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले.

जलस्रोतांच्या व्यवस्थापनासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर, सततची देखरेख आणि समन्वय या मार्गांनी अभियान चालविले गेले. पिण्याला सुरक्षित असे पाणी घरातच मिळाल्याने सार्वजनिक आरोग्य सुधारतेच ; पण मानवी विकास निर्देशांकातही वाढ होते. जलजीवन मिशन आणि एमव्हीएसटीएफ - युनिसेफ महाराष्ट्र सहकार्य यशस्वी झाल्यावर राज्यातील प्रत्येक व्यक्ती घरोघरी पिण्यासाठी शुद्ध पाणी वर्षभर मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहील, असे युनिसेफचे समन्वयक युसुफ कबीर यांनी सांगितले. 

महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन हा राज्य सरकार आणि खासगी क्षेत्रातील उद्योग यांच्या सहकार्याने सुरू झालेला सामाजिक जबाबदारी उपक्रम आहे. राज्यातील जलशक्ती अभियानमध्ये एमव्हीएसटीएफचे योगदान व्यापक आहे. "जल जीवन मिशन'बरोबर एमव्हीएसटीएफ करत असलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रात 1000 गावांत "हर घर नल से जल' हे उद्दिष्ट साधण्यात मदत होईल. 
डॉ. संजय चहांदे, मुख्य सचिव, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र 

8 जिल्ह्यांमधील 20 गटांची निवड 
पाणी वाचविण्याच्या पारंपरिक पद्धतींचे पुनरुज्जीवन, पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्भरण यासाठीच्या पद्धती, पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याच्या पद्धती, जलसंचयाच्या पद्धती आणि वनीकरण यावर या मोहिमेत भर होता. जल शक्ती अभियानच्या निकषानुसार महाराष्ट्रात 8 जिल्ह्यात 20 गटांची निवड झाली होती. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com