अवजड वाहतुकीमुळे नेरळकर अंधारात

नेरळ : जेएनपीटी बंदराकडे खासगी वाहनांतून अजस्र साहित्य घेऊन जाणारे ट्रकचालक.
नेरळ : जेएनपीटी बंदराकडे खासगी वाहनांतून अजस्र साहित्य घेऊन जाणारे ट्रकचालक.

नेरळ : कर्जत तालुक्‍यातून जेएनपीटी बंदराकडे खासगी वाहनांतून अजस्र साहित्य घेऊन जाण्यासाठी महावितरण कंपनी नागरिकांना वेठीस धरत आहे. डिकसळनंतर नेरळमध्येही ट्रकच्या वाहतुकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत महावितरण कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मध्यरात्री अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे नेरळकरांना मनस्‍ताप सहन करावा लागला. 

मुरबाड येथे औद्योगिक वसाहतीमध्ये तयार केलेले लोखंडी बॉयलर रस्ता मार्गाने जेएनपीटी बंदरात नेले जात आहेत. गेल्‍या दोन महिन्यांपासून ११ अजस्र ट्रकच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. नोव्हेंबरमध्‍ये हे ट्रक कर्जतजवळ किरवली येथे उभे करून ठेवण्यात आले होते. त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी महावितरण कंपनीला वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. परंतु त्यावेळी महावितरण कंपनी कंत्राटदाराला खुश करण्यासाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा कोणालाही माहिती न देता बंद करत आहे. त्‍यामुळे नेरळमधील नागरिकांमध्‍ये संतापाचे वातावरण आहे.
 

कर्जत तालुक्‍यात गेल्‍या महिन्यापासून रात्री बारा वाजता वीजपुरवठा खंडित केला जातो आणि पहाटे तीननंतर पुन्हा सुरू करण्यात येतो. या रात्रीच्या वीज गायब होण्याच्या प्रकारचे गूढ नागरिकांना सुरुवातीला लक्षात येत नव्हते; परंतु डिकसळ येथील नागरिकांबरोबर आता नेरळमध्येही मध्यरात्री १ वाजता वीज खंडित करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. माणगाव येथे रस्त्याच्या बाजूला उभे असलेले सात ट्रक कर्जत तालुक्‍यातून पुढे शेलूकडे नेण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. 

सामान्य वीजग्राहकाने शेतजमिनीतील विजेचे खांब हलवण्यासाठी वर्षभर अर्ज-विनंत्या करूनही काम होत नाही. मात्र खासगी वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या आड येणाऱ्या विजेच्या तारा एका रात्रीत बाजूला केल्या जातात. अवजड साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला रस्त्याने नेण्याची परवानगी नसताना ती परवानगी कशी देण्यात आली, याचे महावितरणने उत्तर द्यावे, अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते गोरख शेप यांनी दिली. रात्रीच्या वेळी कोणतीही पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार हा लोकांची फसवणूक आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्‍याचे सामाजिक कार्यकर्ते संजय अभंगे यांनी सांगितले.

ट्रकमधून लोखंडी साहित्य नेण्याची परवानगी रस्तेवाहतूक मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे आम्ही परवानगी देण्याचा प्रश्न नाही. रात्रीच्या वेळी वाहतूक होत असताना कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी बंदोबस्त करण्‍यात आला आहे.
- अविनाश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, नेरळ

कर्जत तालुक्‍यातून संबंधित ट्रक रस्ता मार्गाने नेण्यासाठी कंपनीकडून ३४ लाख रुपये महावितरण कंपनीकडे होणाऱ्या नुकसानभरपाईच्या रूपात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वीज खंडित करून वीजवाहिन्या तोडून रस्ता मोकळा करतो आणि पुन्हा त्या जोडून वीजपुरवठा सुरळीत करतो. 
- आनंद घुले, सहायक अभियंता, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com