Raigad : जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद Raigad Janjira fort closed tourists from today | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंजिरा

Raigad : जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद

मुरूड : ऐतिहासिक जंजिरा किल्‍ला उद्यापासून (ता. २९) पुढील तीन महिने पर्यटकांसह स्थानिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्‍यामुळे वीकेण्ड आणि सुटीचा आनंद घेत पर्यटकांनी किल्‍ला पाहण्यासाठी रविवारी मोठी गर्दी केली होती.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ रांगाच रांगा लागल्या होत्या. तर काही होड्या पर्यटकांना किल्‍ल्‍याजवळ उतरवण्यासाठी वेटिंगवर होत्‍या. अवघ्‍या काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्‍याने, समुद्राच्या पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे. त्‍यामुळे शिडाच्या बोटी भरकटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पर्यटकांची बोट जंजिरा किल्‍ल्‍याच्या प्रवेशद्वाराजवळ आणताना बोटीवरील चालकांना यांना चांगलीच कसरत करावी लागले. काही दिवसांपूर्वी प्रवेशद्वारावर गर्दी झाल्‍याने चेंगरा चेंगरी होऊन दुर्घटनेची शक्‍यता लक्षात घेऊन एक-दीड तासासाठी किल्‍ला बंद करण्यात आला होता.

रविवारीही गर्दी झाल्‍याने असंख्य पर्यटकांना शिडाच्या बोटींमधून किल्ल्यास प्रदक्षिणा घालून किल्ल्याची तटबंदी पाहूनच समाधान मानावे लागले. सोमवारपासून सलग तीन महिने पुरातत्त्व खात्याच्या आदेशानुसार, जंजिरा किल्ला प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंधित केला आहे. शिडाच्या बोटीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कामगारांना तीन महिने रोजगारापासून मुकावे लागणार आहे तसेच राजपुरी बंदरातील स्टॉलधारक तसेच उपहारगृहांनाही १ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.