
Raigad : लाखोंची योजना, तरीही डोक्यावर हंडा
श्रीवर्धन - तालुक्यातील चिखलप ग्रामपंचायतीतील शिरवणे गावात नुकतीच जलजीवन मिशनची पाणी योजना राबवण्यात आली. त्यासाठी १९ लाखांचा खर्चही करण्यात आला. मात्र तरीही गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला नाही. सध्या गावालगतच्या विहिरीवरून भर उन्हात महिलांना पाणी भरावे लागते आहे.
चिखलप ग्रामपंचायतीअंतर्गत हुनरवेल, शिरवणे, पुनीर या गाव-वाड्यांचा समावेश आहे. शिरवणे गावाची लोकसंख्या सातशेच्या आसपास आहे. गावात मध्यंतरी पाणलोट विकास योजनेतून व ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यानंतर भारत निर्माण योजनेतून पाणी योजना राबवली व गतवर्षी नव्याने आलेल्या जलजीवन मिशनची १९ लाख २४ हजारांची पाणी योजना राबवली.
या योजनेसाठी खालापूर येथील देविदास चव्हाण यांना कंत्राट दिले होते. व त्यांना स्थानिक पोटठेकेदार नेमला होता. योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे पाण्यासाठीची पायपीट अद्याप सुरूच आहे.
ग्रामस्थांनी अगोदर असलेल्या टाकीव्यतिरिक्त जलजीवन योजनेसाठी स्वतंत्र टाकी बांधावी, यासाठी पत्रव्यवहार केला आहे, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष होत आहे. योजना राबवूनही घराघरांत पाणी येत नाही, सरकारचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे. त्यामुळे योजनेचे चौकशी करण्यात यावी.
- संतोष पारधी, माजी सदस्य, शिरवणे
शिरवणे गावाच्या नळपाणी योजना राबवली आहे. जलवाहिनीला जोडलेल्या पंपाचे वीजबिल थकीत आहे. याबाबत माहिती घेत ग्रामस्थांची पाणीसमस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- युवराज गांगुर्डे, उपविभागीय अभियंता, म्हसळा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
जलसाठे कोरडे
गेली अनेक दशके खारेपाट विभाग पिण्याच्या पाण्यासाठी वंचित आहे. एप्रिल महिन्यापासूनच याठिकाणी टंचाईच्या झळा बसू लागतात. यंदा उष्मा प्रचंड वाढल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक जलसाठे कोरडे पडले आहेत. परिणामी खारेपाटासह अनेक आदिवासी वाड्यांवर तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे.