रायगड पोलिसांकडून दोन निरापराधांना शिक्षा? 

सुजित गायकवाड
सोमवार, 17 जून 2019

तक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील रहीवाशी विमल तांबे घरावर वापरण्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.
 

नवी मुंबई : तक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील रहीवाशी विमल तांबे घरावर वापरण्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.

हे करण्यासाठी मुंबईतील एका माजी पोलीस अधिकाऱ्याने दिघी सागरी पोलिस ठाणे आणि रायगड पोलिसांवर मुंबईतून दबाव आणल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे चोरीच्या या गुन्हात पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना घटनास्थळी चोरीची कौले आढळून आली नाही. त्यामुळे दुसरीकडून कौलांची ने-आण करताना येथील स्थानिकांनी पोलिसांना रंगेहात पकडल्याने पोलिसांची फजिती झाली. 
मुंबईत राहणाऱ्या विमल तांबे यांनी वडवडी गावातील त्यांच्या घरावरील कौले बदलण्याचे काम याच गावातील सूतार दिलीप व रवी या दोघांना दिले होते.

14 जूनला शुक्रवारी दुपारच्या सुमारास या दोन्ही कामगारांकडून कौले बदलण्याची कामे सुरू असताना काही कौले कमी पडली. परंतू शेजारच्या घरावरील कौले बदलण्याचे कामही याच कामगारांना दिले असल्याने त्यांनी येथील पडीक कौले विमल तांबे यांच्या घरावर वापरण्याचा विचार केला. तसेच विमल यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे विमल यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे अखेर आणलेली कौले आहे त्याच जागेवर ठेवण्यात आली. मात्र आपल्याला न विचारता आपल्या मालकाच्या घराच्या आवारातील कौले वापरलीच कशी असा राग मनात ठेवून केअर टेकर अकबर चिवीलकर यांनी रवी व दिलीप यांच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. या दरम्यान मुंबईतील एका माजी पोलिस अधिकाऱ्याने वारंवार दूरध्वनी करून रायगड पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आपण पोलीस सेवेत असूनही आपल्या व्यक्तीची तक्रार का घेत नाही अशी खोटी बतावणी केली. अखेर रायगड पोलिसांनी समोरील अधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडली.

दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी तक्रारीची शहानिशा न करता थेट दिलीप व रवी यांना वडवली गावातून आहेत त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. दिवसभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवून रात्री 12 नंतर दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी श्रीवर्धन न्यायालयानेही पोलिसांना कामगारांची कोठडी न देता जामिनावर सुटका केली. मात्र दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या या कारभारामुळे रायगड जिल्ह्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे. 

हा खटाटोप कशासाठी 
चोरीच्या गुन्ह्यासाठी शनिवारी सकाळी दिघी सागरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार पी.एन. पाटील आणि पोलिस नाईक के. एन. जागडे हे गावातील पोलिस पाटील आणि काही खाजगी पंचांना सोबत घेऊन वडवली गावात पंचनामा करण्यासाठी गेले. विमल तांबे यांच्या घरापाठीमागे गेले असता चोरीत केलेल्या उल्लेखानुसार घराबाहेर कौले नसलेली पाहून आपला खोटारडेपणा सावरण्यासाठी पोलिसांनी गावातीलच स्थानिक मूले सूचिंद्र जाधव व निलेश बिऱ्हाडी यांच्या मदतीने पुन्हा शेजारच्या घरातील कौले आणून ठेवण्यास सांगितले. याकामासाठी आपल्याला पोलिसांनी 200 रूपये दिल्याचेही निलेशने सांगितले. ही बाब इतर स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना याप्रकाराचा जाब विचारला. तेव्हा आपण रंगेहात पकडले गेल्याची जाणीव पोलिसांना झाल्यावर त्यांनी पळ काढला. 

आपल्यावर कोणत्याही मुंबईतील अधिकाऱ्याचा दबाव नसून कोणाचाही फोन आलेला नाही. तसेच कोणी बनावट पंचनामा करीत असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी. - अनिल पारसकर. पोलिस अधिक्षक, रायगड पोलिस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad police get punishment for two innocent?