रायगड पोलिसांचा रुबाब वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

मुंबई : उन्हापासून संरक्षण करणारी आणि रुबाबही वाढवणारी नवी "पी-कॅप' लवकरच रायगड पोलिसांना मिळणार आहे. रायगडचे अधीक्षक अनिल पारसकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शिपायापासून सहायक फौजदारापर्यंतच्या सर्वच 2 हजार 225 पोलिसांना प्रत्येकी दोन नवीन टोप्या देण्यात येणार आहेत.

सध्याच्या टोपीमुळे बंदोबस्ताच्या दरम्यान उन्हाचा त्रास पोलिसांना होतो. त्यामुळे नवीन "पी-कॅप' पुरविण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला. याचा पायलट प्रोजेक्‍ट मुंबई पोलिसांनी राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ही टोपी उन्हापासून संरक्षण करणार असून बंदोबस्ताच्या वेळी ती हाताळण्यासही सोईची वाटते. त्यामुळे रायगड पोलिसांसाठीही ती वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून तिची मागणी करण्यात आली आहे. 4 हजार 450 पी-कॅप रायगड पोलिसांना मिळणार आहेत. त्यासाठी सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. 

काही दिवसांत जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना या टोप्यांचा वापर करता येणार आहे, असे पोलिस अधीक्षक कार्यालयातील गृह विभागाचे उपअधीक्षक व्ही. जे. पांढरपट्टे यांनी सांगितले. 

अशी आहे टोपी 
नवी टोपी ही पी-कॅप पद्धतीची आहे. तिच्या समोरील भाग निळ्या आणि लाल रंगाचा आहे. तिच्या समोर "महाराष्ट्र पोलिस'चा लोगो असणार आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही टोपी उपयोगी ठरणार आहे. उन्हापासून त्यांचे संरक्षण होणार आहे. जुनी टोपीही पोलिसांसोबत राहणार आहे. नवीन टोपीचा वापर बंदोबस्तासाठीच केला जाईल. 
- व्ही. जे. पांढरपट्टे, उप-पोलिस अधीक्षक, गृह विभाग 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad police new look

फोटो गॅलरी