रायगड पोलिसांकडून निरपराध्यांना शिक्षा?

रायगड पोलिसांकडून निरपराध्यांना शिक्षा?

मुंबई - आलेल्या तक्रारींची खातरजमा करणे व ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे खरे तर पोलिसांचे कर्तव्य... परंतु तेच कर्तव्य पाळण्यात रायगड पोलिसांकडून कसूर झाल्याचे नुकतेच एका घटनेतून समोर आले आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील वडवली गावात दूरध्वनीवरून आलेल्या अशाच एका तक्रारीची खातरजमा न करताच दोन गरीब कामगारांवर थेट चोरीचा आरोप लावून या पोलिसांनी त्यांना पूर्ण दिवस व रात्रभर कोठडीत ठेवले. दिघी पोलिसांच्या या संतापजनक प्रकाराने वडवली गावातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. ज्यांनी आयुष्यात पोलिस ठाण्याची पायरी पाहिली नव्हती, त्यांच्यावर या पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे कोठडीत राहण्याची वेळ आली. अनेकदा तक्रारदार समोर असूनही तक्रार घेण्यास टाळाटाळ करणारे पोलिस दूरध्वनीवरून आलेली तक्रार दाखल करण्यात एवढे तत्पर कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

वडवली गावात सुतारकाम करणारे रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर जुनी पडीक कौले चोरून याच गावातील रहिवासी विमल तांबे यांच्या घरावर वापरण्याचा आरोप पोलिसांनी लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. हे करण्यासाठी मुंबईतील एका माजी पोलिस अधिकाऱ्याने दिघी सागरी पोलिस ठाणे आणि रायगड पोलिसांवर मुंबईतून दबाव आणल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे चोरीच्या या गुन्ह्यात पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना घटनास्थळी चोरीची कौले आढळून आली नाहीत. त्यामुळे गुन्हा सिद्ध करण्यासाठी दुसरीकडून घटनास्थळी कौले आणताना येथील स्थानिकांनी पोलिसांना रंगेहाथ पकडल्याने पोलिसांचीच पंचाईत झाली.

मुंबईत राहणाऱ्या विमल तांबे यांनी वडवडी गावातील त्यांच्या घरावरील कौले बदलण्याचे काम याच गावातील सुतार दिलीप व रवी या दोघांना दिले होते. शुक्रवारी (ता. १४) दुपारच्या सुमारास या दोन्ही कामगारांकडून कौले बदलण्याचे काम सुरू असताना काही कौले कमी पडली, परंतु शेजारच्या घरावरील कौले बदलण्याचे कामही याच कामगारांना दिले असल्याने त्यांनी येथील पडीक कौले विमल तांबे यांच्या घरावर वापरण्याचा विचार केला. तसेच विमल यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र पावसामुळे विमल यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे अखेर आणलेली कौले आहे त्याच जागेवर ठेवण्यात आली; मात्र आपल्याला न विचारता आपल्या मालकाच्या घराच्या आवारातील कौले वापरलीच कशी, असा राग ठेवून केअर टेकर अकबर चिवीलकर यांनी मालकाच्या वतीने रवी व दिलीप यांच्याविरोधात दिघी सागरी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. यादरम्यान मुंबईतील एका माजी पोलिस अधिकाऱ्याने वारंवार दूरध्वनी करून रायगड पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आपण पोलिस सेवेत असूनही आपल्या व्यक्तीची तक्रार का घेत नाही, अशी खोटी बतावणी केली. अखेर रायगड पोलिस समोरील अधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडले. दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक धर्मराज सोनके यांनी तक्रारीची शहानिशा न करता थेट दिलीप व रवी यांना वडवली गावातून आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. दिवसभर पोलिस ठाण्यात डांबून ठेवून रात्री १२ नंतर दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी श्रीवर्धन न्यायालयानेही पोलिसांना कामगारांची कोठडी न देता जामिनावर सुटका केली; मात्र दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या या कारभारामुळे रायगड जिल्ह्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे.

हा खटाटोप कशासाठी
दिघी सागरी पोलिस ठाण्यातील हवालदार पी. एन. पाटील आणि पोलिस नाईक के. एन. जागडे खासगी पंचांसोबत वडवली गावात पंचनामा करण्यासाठी गेले. विमल तांबे यांच्या घरामागे गेले असता तक्रारीतील उल्लेखानुसार घराबाहेर कौले नसलेली पाहून आपला खोटारडेपणा सावरण्यासाठी पोलिसांनी गावातील मुलांच्या मदतीने पुन्हा शेजारच्या घरातील कौले आणून ठेवण्यास सांगितले. या कामासाठी त्यांना २०० रुपये दिल्याची बाब इतर स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना या प्रकाराचा जाब विचारला. तेव्हा आपण रंगेहात पकडले गेल्याची जाणीव पोलिसांना झाल्यावर त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

आपल्यावर कोणाचाही दबाव नसून कोणीही यासंदर्भात दूरध्वनी केलेला नाही. तसेच कोणी बनावट पंचनामा करीत असल्यास तशी तक्रार आल्यास कारवाई करू.
- अनिल पारसकर, पोलिस अधीक्षक, रायगड पोलिस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com