Raigad : पोलिस वर्दीत समाजसेवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वरिष्ठ निरीक्षक विजय कांदळगावकर

Raigad : पोलिस वर्दीत समाजसेवक

धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कांदळगावकर ३८ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. या काळात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत कांदळगावकर यांनी सेवा बजावली आहे. १९८५ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून ते पोलिस दलात भरती झाले.

त्‍यानंतर त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून पोलिसातील माणूस जिवंत ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. गुन्हेगारांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, त्यांनी शिक्षण घेऊन चांगल्या मार्गाला लागावे, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.

आज हीच मुले विविध क्षेत्रात चांगल्या स्थितीत काम करून स्थिर झालेली आहेत. ही मुले व त्यांचे कुटुंबीय अचानक भेटल्यावर कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतात, असे कांदळगावकर सांगतात. शिक्षण घेतल्याने कुटुंब, समाज व देश सुदृढ होतो, यावर त्यांचा विश्वास आहे. कांदळगावकर यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुन्हेगारी क्षेत्रातून दूर झालेले आहेत.

कोरोनाकाळात कांदिवली पोलिस ठाणे हद्दीतील रस्त्यावरील बेघर, रिक्षा-टॅक्सीचालकांना जेवण देणे, तृतीयपंथींना पोटभर जेवण मिळेल, याकडे त्‍यांनी जातीने लक्ष दिले होते. वरिष्ठांनी धारावी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती दिल्यावर तेथील विविध जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून सामाजिक सलोखा वाढीस लावण्याचे काम त्‍यांनी सुरू केले.

कोरोनानंतर धारावीत मोहरम साजरा झाला, त्या वेळी ताजीय दफन करण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. कांदळगावकर यांच्याकडे मुस्लिम बांधवांनी यातून मार्ग काढण्यासाठी गळ घातली. वरिष्ठांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ताजीय दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा उचलला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी आदी सणांना धारावीतील सर्व समाजातील लोकांना एकत्र करून हे धार्मिक सण साजरे केले.

पाेलिस दलातील कामगिरी

२००३ मध्‍ये गेट वे ऑफ इंडिया येथील बॉम्बस्फोटातील आरोपींना जेरबंद करण्यात त्‍यांचा सहभाग होता. गोरेगाव येथील नेस्को या ठिकाणी भरलेल्या हिऱ्यांच्या प्रदर्शनातून सहा कोटींचे हिरेचोरी झाली होती. त्यातील चार विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्या तपासकार्यात कांदळगावकर होते.

जेम्स अँड ज्वेलरी यांची सहा कोटी रुपयांची ज्वेलरी बंदुकीचा धाक दाखवून लुटून नेले होते. हे दागिने मिळवून देण्यासाठी झालेल्या कार्यवाहीत त्‍यांचा मोठा वाटा होता. विद्यार्थिनींना ‘गुड टच, बॅड टच’ याची माहिती देण्यासाठी सहकाऱ्यांच्या मदतीने ते अभियान राबवत आहेत.

धारावीत जेवढे चांगले काम करता येईल, तेवढे करून सेवानिवृत्त होण्याचा मानस कांदळगावकर बोलून दाखवतात. अशा या अवलियात गायकही लपलेला आहे. संधी मिळताच त्यांच्यातील गायक जागा होतो. अशी ही वल्ली येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यानंतरही समाजसेवेचा त्‍यांचा मानस आहे.