रायगड झेडपी अध्यक्षपदासाठी आरक्षणाकडे डोळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची आघाडी असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आदिती तटकरे या अध्यक्ष आहेत. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने नव्या अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे.

मुंबई : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 24 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण ही उत्सुकता जिल्ह्यात असली तरी अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याने राजकीय गोटात शांतता आहे.

जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची आघाडी असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आदिती तटकरे या अध्यक्ष आहेत. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने नव्या अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे. मात्र या पदासाठी अजून आरक्षण जाहीर झाले नसल्याने राजकीय पक्षांची नेतेमंडळी शांत आहेत.
सूत्रांनुसार जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला आरक्षणाची सोडत निघण्याची शक्‍यता आहे. याचदरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास अध्यक्षपदाची निवडणूकही पुढे ढकलण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेची माघार?
जिल्हा परिषदेत बहुमत मिळवण्यासाठी किमान 30 सदस्यांची आवश्‍यकता आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 19; तर भाजपचे 3 सदस्य आहेत. यातून बहुमत मिळत नसल्याने शिवसेना या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता नाही.

आघाडीला स्पष्ट बहुमत
जिल्हा परिषदेत 59 सदस्यसंख्या आहे. यामध्ये आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे सर्वाधिक 23, राष्ट्रवादी 12 आणि कॉंग्रेस 3 असे पक्षीय बलाबल आहे. या सर्वांची आघाडी असल्याने स्पष्ट बहुमत आहे.

राज्य सरकार जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मुदतवाढ मिळावी, अशी अद्यापपर्यंत कोणतीही मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आलेली नाही.
- सुनील तटकरे, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस

जिल्हा परिषदेमध्ये युतीला मताधिक्‍य नाही. त्यामुळे निवड प्रक्रियेमध्ये जो अध्यक्ष म्हणून नियुक्त होईल तो आम्हाला मान्य असेल.
- सुरेंद्र म्हात्रे, विरोधी पक्षनेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad President of District, Aditi Tatkare

फोटो गॅलरी