खालापुरात 40 कोंबड्या दगावल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

सध्या भात लावणीच्या कामासाठी मजुरीवर आदिवासी कुटुंब दिवसभर बाहेर असतात. रविवारी (ता. 28) चौक येथील आदिवासी बांधव शेतीच्या कामावर गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यानंतर घराभोवती मरून पडलेल्या कोंबड्या पाहून त्यांना धक्काच बसला.

मुंबई ः विषारी पदार्थ खाल्ल्याने 40 कोंबड्या दगावल्याची घटना रायगड जिल्ह्यातील चौक येथील आदिवासी कातकर वाडी येथे घडली. हातावर पोट असलेल्या आदिवासी कुटुंबांच्या या कोंबड्या असून अचानक घडलेल्या या प्रकाराने आदिवासी बांधव हवालदिल झाले आहेत. सध्या भात लावणीच्या कामासाठी मजुरीवर आदिवासी कुटुंब दिवसभर बाहेर असतात. रविवारी (ता. 28) चौक येथील आदिवासी बांधव शेतीच्या कामावर गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यानंतर घराभोवती मरून पडलेल्या कोंबड्या पाहून त्यांना धक्काच बसला. पावसाळ्यात सापांचा वावर आणि अनेकदा शेतात खेकड्यांना प्रतिबंध म्हणून रासायनिक औषध फोरेटचा वापर केला जातो. त्यामुळे कोंबड्यांना विषबाधा झाली असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते संजय गुरव यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad problem