Raigad : प्रकल्‍पबाधित शेतकरी आंदोलनाच्या तयारीत; संपादित जमिनी परत देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raigad

Raigad : प्रकल्‍पबाधित शेतकरी आंदोलनाच्या तयारीत; संपादित जमिनी परत देण्याची मागणी

मुरूड - तालुक्यामधील साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीने चेहेर, मिठेखार, निडी परिसरातील शेतकऱ्यांसोबत केलेल्या सामंजस्य कराराचे उल्लंघन केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून आपल्‍या जमिनी परत देण्याची मागणी करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत नुकतीच रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना निवेदन दिले असून १७ मे रोजी याप्रकरणी बैठक होणार आहे. त्‍यानंतरही कार्यवाही न झाल्‍यास शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत भूमिका स्‍पष्‍ट करण्यासाठी तसेच लढ्याची दिशा कशी ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.

शेतकऱ्यांच्या जमिनी सिकॉमकरिता महाराष्ट्र सरकारने संपादित केल्‍या होत्‍या. भूसंपादन करून भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीवर १९८९ मध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज यांचा विक्रम इस्पात हा प्रकल्प वेलस्पन मॅक्सस्टील लिमिटेड यांनी विकत घेतला होता.

त्‍यानंतर हा कारखाना जेएसडब्लू स्टील लिमिटेड, साळाव या कंपनीने अधिग्रहीत केला. सुरवातीला वेलस्पन मॅक्सस्टील लिमिटेड व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यामध्ये २०१० मध्‍ये सामंजस्य करार करण्यात आला होता. मात्र त्‍यानंतर करारातील अटींचे वारंवार उल्लंघन करीत शेतकऱ्यांवर अन्याय केल्‍याने १२९ शेतकऱ्यांनी अधिग्रहीत केलेल्या जमिनी परत देण्याची मागणी केली आहे.

अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी तसेच लढा लोकशाही व कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी चेहेर, नवीन चेहेर, मिठेखार, निडी, वाघूळवाडी, साळाव प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांशीच चर्चा करूनच निर्णय घेतला आहे, त्या वेळी शेतकऱ्यांनी करारास संमती दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या दालनात २२ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनी व्यवस्थापनाची बैठकही झाली होती. त्‍या वेळी झालेल्‍या चर्चेनुसार निर्णय घेण्यात आला आहे.

- बळवंत जोग, सहायक उपाध्यक्ष, जेएसडब्ल्यू

प्रकल्‍पग्रस्‍त शेतकऱ्यांकडून जमिनी परत मिळण्याबाबत निवेदन मिळाले आहे. याबाबत कंपनी तसेच शेतकऱ्यांबरोबरच लवकरच बैठक घेणार असून सामोपचाराने निर्णय घेण्याचा प्रयत्‍न केला जाईल.

- डॉ. योगेश म्हसे,जिल्हाधिकारी-रायगड