Raigad : वीटभट्टी व्यवसायावर पावसाची अवकृपा Raigad Rains affect brick kiln business | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीटभट्टीसाठी सुरू असलेली तयारी.    (संग्रहित)

Raigad : वीटभट्टी व्यवसायावर पावसाची अवकृपा

नेरळ : काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असून मंगळवारी कर्जत तालुक्‍याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे वीटभट्टीवरील कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले तर तर लावलेल्या भट्ट्याही उद्‌ध्वस्‍त झाल्‍या. एकीकडे रॉयल्टीसाठी सरकार तगादा लावत असताना दुसरीकडे सिमेंट ब्लॉकमुळे पारंपरिक वीट व्यवसाय संकटात सापडला आहे. त्‍यात आता अवकाळीने एकट्या कर्जत तालुक्यात वीटभट्टीचालकांचे कोट्यवधींचे नुकसान केले आहे.

विटांशिवाय घराच्या भिंती उभ्या राहत नाहीत. वीट निर्मितीसाठी आजही पारंपरिक पद्धत वापरली जाते. कच्ची मातीची साच्यात बनवलेली वीट दगडी कोळशाची भट्टी लावून भाजली जाते. त्यानंतर भट्टीतून तयार टणक वीट बांधकामासाठी वापरली जाते. गेल्‍या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले होते. एक दोनदा रिमझिम पाऊस पडल्‍याने वीटभट्टीचालक, शेतकरी धास्तावले होते. त्यातच मंगळवारी जोरदार हजेरी लावली.

तालुक्यात ५०० हून अधिक वीटभट्टींवर पावसाने अवकृपा केली आहे. मजुरांनी वीटा बनवून सुकायला ठेवल्‍या होत्‍या. मात्र पावसामुळे सर्व कच्च्या वीटा तुटल्‍याने मोठे नुकसान झाले आहे. भट्टी लावण्यासाठी उघड्यावर ठेवलेला कोळसाही भिजला आहे. त्‍यामुळे वीटभट्टी चालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून नवीन कोळसा आणण्यासाठी भुर्दंड पडणार अाहे.

वीटभट्‌टी चालकांना रॉयल्‍टीसाठी सरकारकडून तगादा लावला जातो, मात्र नुकसान झाल्यावर भरपाई दिली जात नाही. पावसापासून बचावासाठी काही वीटभट्टी चालकांनी तसेच मजुरांनी ताडपत्रीने कच्च्या वीटा झाकण्याचा प्रयत्‍न केला, मात्र पावसाच्या जोरदार सरींमुळे मोठे नुकसान झाले. किमान २५ हजार कच्च्या वीटा तुटल्‍या आहेत. कोळसाही भिजल्‍याने पुन्हा भट्‌टी लावावी का, असा प्रश्‍न आहे. सरकारकडून नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे.

- महेंद्र म्हसकर, वीटभट्टीचालक, नेरळ

तालुक्यात ५०० हून अधिक वीटभट्टी चालक, मालक आहेत. अवकाळी संकटाने सगळ्यांनाच बेजार केले आहे. अनेकांनी सोने, दागिने गहाण ठेऊन कच्चा माल आणि वीटभट्टीसाठी भांडवल उभे केले होते. मात्र पावसाने सगळ्याची माती केली. तुटलेला माल परत वापरात येणे अशक्य आहे. वीटभट्टीसाठी सरकार नुकसानभरपाई देत नाही, मात्र रॉयल्टीसाठी तगादा लावून वसूल केली जाते.

- सुनील घोडविंदे, अध्यक्ष, बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स संघटना, कर्जत