Raigad : रेवसमध्ये अवतरला शिवकालीन इतिहास Raigad Revus History Shiva incarnated | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवकालीन

Raigad : रेवसमध्ये अवतरला शिवकालीन इतिहास

अलिबाग : कलेला वयाची मर्यादा कधीच नसते हे अलिबाग तालुक्यातील रेवस परिसरातील चित्रकार सुरेंद्र मोकल यांनी दाखवून दिले आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यांची कला सर्वदूर पोहचली असून आजही वयाच्या ६२ वर्षी त्यांनी साकारलेल्या शिवकालीन इतिहासाला सर्व स्तरांतून कौतुकाची थाप मिळत आहे.

रेवस येथील सुशील भोसले शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. याच अनुषंगाने नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने दत्तपाडा गावचे रहिवासी सुरेंद्र मोकल यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

शिवजयंती सोहळा असल्याने मोकल यांनी साकारलेल्या शिवकालीन इतिहासावरील महाराजांची चित्रे या प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरली. त्याचबरोबर लता मंगेशकर, कपिल देव, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, महात्मा गांधी, अभिनेत्री नूतन, यासह इतर चित्रांचादेखील यात समावेश होता.

शिवकालीन इतिहास जागवणारी २९ चित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली होती. अफजलखान वध, रायगडावर घेतलेली शपथ, पन्हाळा गडावरून सुटका, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान अशा एक ना अनेक विषयांतून हा इतिहास मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून त्यांच्या कलाकृतीची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

४० वर्षांची अविरत मेहनत

सुरेंद्र मोकल हे एका सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आले. शालेय शिक्षण मराठीत झाले, पण लहानपणापासून त्यांना चित्रकलेची आवड आहे, जसे जमेल तसे पाहून ते चित्र रेखाटू लागले. इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, सुनील गावसकर यांची चित्र स्केच-पेन्सिलने रेखाटली आहेत. केवळ आवड आणि सरावातून त्यांची चित्रकला बहरत गेली. विशेष म्हणजे, ४० वर्षांत त्यांनी दोन वेळा प्रदर्शन भरवले आहे.