नामसाधर्म्याचा स्मार्ट अडथळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

प्रत्येक आगारात एक स्वतंत्र कक्ष स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ठेवण्यात आले. जिल्ह्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांकडून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एसटी आगारासह वेगवेगळ्या खासगी केंद्रांमध्ये चांगला प्रतिसाद मिळू लागला.

अलिबागः कागदी पास फाटण्याच्या तक्रारी वाढल्याने एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी व प्रवाशांना स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दहा महिन्यांपासून स्मार्ट कार्ड नोंदणीचे काम सुरू केले. स्मार्ट कार्डसाठी एसटी आरक्षण कार्यालयासमोर प्रवाशांची गर्दी होऊ लागली; मात्र दोन व्यक्तींची सारखी नावे असल्याने ऑनलाईन नोंदणी होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे.

विनावाहक बसमुळे फुकट्यांची सोय
 
एसटीतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने स्मार्ट कार्ड देण्याची अंमलबजावणी मे 2019 पासून सुरू केली. ऑनलाईन पद्धतीने स्मार्टकार्ड नोंदणीचे काम केले. प्रत्येक आगारात एक स्वतंत्र कक्ष स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ठेवण्यात आले. जिल्ह्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांकडून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एसटी आगारासह वेगवेगळ्या खासगी केंद्रांमध्ये चांगला प्रतिसाद मिळू लागला. एक हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना आतापर्यंत स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढत असताना विद्यार्थ्यांसाठीही स्मार्ट कार्ड देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

स्मार्ट कार्डला ज्येष्ठ नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असताना दोन व्यक्तींचे एकच नाव असल्याने स्मार्ट कार्ड नोंदणी होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू लागला आहे. दोन व्यक्तींची सारखी नावे असल्याने ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी न करताच परत जाण्याची वेळ आली आहे. स्मार्ट नसेल तर एसटीतून प्रवास करणे भविष्यात कठीण होऊन बसणार आहे. एसटी महामंडळ आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

दोन व्यक्तींची एकच नावे असल्याने माझी स्मार्ट नोंदणी होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. अनेक वेळा आगारात जाऊन विचारणा केली; परंतु त्यावर कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध झाला नाही. 
- नारायण पाटील, ज्येष्ठ नागरिक 

नावे समान असली तरीही आधार कार्डमुळे स्मार्ट नोंदणी होणे अपेक्षित आहे. तरीही काही समस्या असल्यास तांत्रिक बाबी समजून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. 
- अनघा बारटक्के, 
विभाग नियंत्रक, रायगड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-st online smart card problem