
Raigad : संपामुळे कार्यालयांत शुकशुकाट
अलिबाग : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एरव्ही गजबजणाऱ्या कार्यालयात मंगळवारी (ता. १४) शुकशुकाट पहावयास मिळाला.
त्यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त आलेल्या अनेकांवर परतीचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली. या वेळी अलिबागसह कर्जत, खालापूर, उरणमधील शाळा शंभर टक्के बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरीच राहणे पसंत केले.
अलिबागसह रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील महसूल, वन, आरोग्य, शिक्षण, कृषी इत्यादी सर्व विभागातील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, विविध प्राधिकरण, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिचारिका व कर्मचारी, सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व चतुर्थ श्रेणी (गट ड) कर्मचारी, महानगरपालिका,
नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी, सफाई कामगार, सर्व शासकीय कार्यालयातील अंशकालीन, रोजंदारी व कंत्राटी कर्मचारी, महिला परिचर, सर्व विभागातील वाहनचालक अशा ६२ विभागात १५ हजारपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
कृषी, महसूल, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या कामांसाठी अलिबागमधील विविध सरकारी कार्यालयात हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात; पण विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कर्मचारी, शिक्षकांनी मंगळवारी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने आंदोलनाचा परिणाम जिल्ह्यावर दिसून आला.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे, रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, अशा अनेक मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी व शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या मागण्यासाठी तालुकास्तरावर ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली होती. या वेळी आंदोलकांनी निदर्शनासह घोषणाबाजी केली.
२५ टक्केच शिक्षक सहभागी
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये सहा हजार ३९१ शिक्षक व शिक्षण सेवक आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील दोन हजार ३१० शिक्षक व शिक्षण सेवक संपात सहभागी झाले होते. त्यामुळे शिक्षकांचा संपात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. फक्त २५ टक्के शिक्षक संपात सहभागी झाल्याने अलिबाग तालुक्यातील काही शाळा सुरु होत्या.
गैरसोय होऊ नये, यासाठी नायब तहसीलदार, कोतवाल, प्रशिक्षणार्थी तहसीलदार उपलब्ध आहेत. त्यांच्यामार्फत नागरिकांचे प्रश्न सोडवले जात आहेत. वेगवेगळे दाखले, अॅफिडेव्हिटची कामे या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली जात आहेत.
- विक्रम पाटील, तहसीलदार
रायगड जिल्ह्यातील खालापूर, उरण, कर्जत तालुक्यातील शाळा बंद होत्या; परंतु अलिबागसह अन्य तालुक्यात काही शाळा सुरू होत्या; मात्र उद्यापासून शंभर टक्के शाळा बंद असणार आहेत.
- राजेंद्र म्हात्रे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
विभागातील कार्यालये सुरू होती. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व कार्यालयांमध्ये पुरेसे कर्मचारी उपस्थित असून कामकाजावर परिणाम झालेला नाही. सर्व अधिकाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद