रायगडची पर्यटनस्थळे ओस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

गेल्या आठवड्यात धुवाधार कोसळलेल्या पावसाने चार दिवसांपासून दडी मारल्याने रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य धबधबे कोरडे पडले आहेत. ओढे आणि धरणाच्या सांडव्यांचे प्रवाहही क्षीण झाले आहेत. 

मुंबई : गेल्या आठवड्यात धुवाधार कोसळलेल्या पावसाने चार दिवसांपासून दडी मारल्याने रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य धबधबे कोरडे पडले आहेत. ओढे आणि धरणाच्या सांडव्यांचे प्रवाहही क्षीण झाले आहेत. त्यामुळे या आठवडाअखेरचे दोन्ही दिवस पावसाळी पर्यटनस्थळी शांतताच होती. 

जिल्ह्यात देवकुंड, आषाणे कोषाणे, झेनिथ, पांडवकडा धबधबे- धरणक्षेत्रावर बंदी घातली आहे. मात्र सुधागड तालुक्‍यातील घपकी, सिद्धेश्वर, कवेळे, कोंडगाव येथील धरणे- धबधब्यांबरोरच पेण, खालापूर, महाड, मुरूड आणि अलिबाग आदी तालुक्‍यातील सुरक्षित धबधबे आणि धरणांच्या सांडव्याखाली पर्यटक वर्षा-सहलीचा आनंद घेतात. 

ताम्हणी घाटातील धबधब्यांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. मात्र चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पांढरेशुभ्र धबधबे गायब झाले आहेत. सांडव्यांचा प्रवाहही संथ आहेत. त्यामुळे आठवड्याअखेर पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांचा हिरमोड झाला. 
 
काही दिवसांपूर्वी ताम्हिणी घाटात वर्षा-सहलीला जाण्याचा निश्‍चय केला होता. मात्र पाऊसच नसल्याने बेत रद्द करावा लागला. येत्या आठवड्यात तरी वरुणराजाची कृपा राहावी, अशी इच्छा आहे. 
- सुशील शिंदे, पाली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad's tourist places are quiet