Mumbai Rains :  रेल्वेच्या हजारो प्रवाशांचे अतोनात हाल

Mumbai Rains :  रेल्वेच्या हजारो प्रवाशांचे अतोनात हाल

मुंबई - मुंबई परिसरात सोमवारी (ता. १) रात्री मुसळधार पावसाने रेल्वे आणि बस सेवा ठप्प झाल्या. प्रशासनाने कोणतीही आपत्कालीन उपाययोजना न केल्यामुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सुंदर मुंबईचा तोरा मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेचा नालेसफाईचा दावा पोकळ असल्याचेही उघड झाले. रस्त्यांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही रात्री उशिरापर्यंत दिसले नाहीत. 

मुंबईत सोमवारी रात्री पाऊस सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच रेल्वेमार्गांवर तुडुंब पाणी भरले. घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, शीव आदी ठिकाणी लोकल ठप्प झाल्यामुळे महिला आणि वृद्ध प्रवासी हवालदिल झाले. खोपोली, कल्याण आणि बदलापूर अशी लोकलची रांग लागली होती. दीड-दोन तास लोकलमध्ये बसून राहिल्यावर अखेर काही जणांनी रेल्वेमार्गातून चालत जाण्याचा पर्याय निवडला. काही महिला डब्यांत पोलिस नव्हते. त्यामुळे प्रवासीच एकमेकांना हात देऊन उतरण्यासाठी मदत करत होते. विद्याविहार स्थानकात मात्र रेल्वे पोलिस रूळावरून येणाऱ्या प्रवाशांना हात देत होते. संपूर्ण फलाट प्रवाशांनी भरला होता. तिकीटघरही पाण्यात गेले होते. बेस्टची एकही बस नव्हती. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिसांचे पथकही हजर नव्हते. त्यामुळे रेल्वेमार्गावरून रस्त्यावर आलेल्या प्रवाशांची स्थिती दयनीय झाली. अनेक ठिकाणी स्थानिकच अडकलेल्या प्रवाशांना रिक्षा-टॅक्‍सी मिळवून देत होते. विशाल भानुशाली, राहुल सोनावणे आणि अन्य काही जणांनी स्वतःच्या वाहनांमधून प्रवाशांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी सोडले. टिळकनगर पोलिसांचे पथकही मदतीसाठी रस्त्यावर उतरले होते. एरवी मुंबईवर हक्क सांगणाऱ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि प्रशासनाने मात्र विशेष काही न करण्यातच धन्यता मानली. 

जाहिरातींपेक्षा पावसाची माहिती द्या! 
रेल्वेगाड्यांत मसाले आणि गृहप्रकल्पांची जाहिरातबाजी करणाऱ्या प्रशासनाने किमान मुसळधार पावसात तरी प्रवाशांना उपयुक्त ठरेल अशी माहिती द्यावी. त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा रेल्वेला परवडत नाही का, असा सवाल प्रवासी मधुकर साने याने केला. स्थानकांत उद्‌घोषणा होत नसल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com