रेल्वेच्या डीएफसीसी कॉरिडॉर विरोधात शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

प्रमोद पाटील
सोमवार, 9 एप्रिल 2018

डीएफसीसी कॉरिडॉर साठी या शेतकऱ्यांची जमिन संपादित करण्यात येत आहे त्या साठी ची नुकसान भरपाई अत्यल्प असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच प्रकल्पासाठी इतर गावातील शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला असताना फक्त माकूणसार गावातील शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला जाणार आहे यास सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

सफाळे : पालघर तालुक्यातील माकूणसार येथील सुमारे 27 शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांची शनिवारी भेट घेऊन रेल्वेच्या डीएफसीसी कॉरिडॉर साठी होणाऱ्या जमिन संपांदनाला विरोध दर्शविला. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

डीएफसीसी कॉरिडॉर साठी या शेतकऱ्यांची जमिन संपादित करण्यात येत आहे त्या साठी ची नुकसान भरपाई अत्यल्प असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच प्रकल्पासाठी इतर गावातील शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला असताना फक्त माकूणसार गावातील शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला जाणार आहे यास सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, विधानसभा संघटक जगदीश धोडी, विभाग प्रमुख नागेश वर्तक, शाखाप्रमुख भुपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पालघर जिल्हाधिकारी प्रशांत ननावरे यांची भेट घेऊन अत्यल्प दरात होणाऱ्या जमिन संपादनाला विरोध दर्शविला आणि शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली. पालघर जिल्ह्यातील शेतजमिनी ह्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी संपादित केल्या जात आहेत परंतु जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्याला त्याची योग्य ती नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी उध्वस्त होणार आहे या विरोधात शिवसेनेने आवाज उठवून शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात योग्य नुकसान भरपाई सोबत प्रकल्पग्रस्ताचा दर्जा आणि भूसंपादन झाल्यावर शिल्लक राहणाऱ्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता अशा मागण्या करण्यात आल्या आहेत..

जोपर्यंत योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. ज्या भागात जमीन खरेदी विक्री चे व्यवहार कमी प्रमाणात होतात तेथे कमी दराने नुकसान भरपाई हे समीकरण शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे, पालघर जिल्ह्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जमिनीला सोन्याचा भाव निर्माण झाला आहे असे असताना प्रकल्पासाठी कमी दर देऊन होणारे भूसंपादन हे शेतकऱ्यावर अन्याय कारक आहे या प्रकरणी योग्य लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

Web Title: railway corridor shivsena agitation