भंगारचोरांच्या हातातून रेल्वेमार्गात पडली सळई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई - हार्बर रेल्वेमार्गावरील डॉकयार्ड व रे रोड स्थानकांदरम्यान नऊ मीटर लांबीची जाडजूड सळई सापडल्यामुळे मंगळवारी रात्री एकच खळबळ उडाली. भंगार चोरणाऱ्यांच्या हातातून चालत्या लोकलमधून ही सळई खाली पडल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सळई लगेच सापडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी रात्री 11.30च्या सुमारास ही सळई लोकलमधून खाली पडली. मार्गावर सळई दिसताच लोकल थांबवण्यात आली; अन्यथा मोठा अपघात घडला असता. याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिस व गुन्हे शाखा तत्काळ कामाला लागले. बुधवारी सकाळी रेल्वे पोलिसांनी मोकर अली शाहूर अली शेख (वय 21) व हुसैन शेख (48) यांना अटक केली.

सॅण्डहर्स्ट रोड रेल्वेस्थानकावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या मदतीने संशयित आरोपींची ओळख पटली. त्यानंतर बुधवारी त्यांना रे रोड परिसरातून अटक करण्यात आली. साधारण 50 किलोची ही सळई विकून ते पैसे मिळवणार होते. दोघेही व्यसनी असून, त्यासाठी ते भंगार चोरत असल्याचा संशय आहे. रेल्वे कायदा कलम 150 नुसार त्यांच्याविरोधात वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: railway issue