मुंबईत तिन्ही मार्गांवर रेल्वे पोलिसांची गस्त 

मंगेश सौंदाळकर - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - रेल्वेत घातपाताचे प्रकार रोखण्याकरिता रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा योजना आखली आहे. यानुसार तिन्ही मार्गांवर अचानक भेटी देण्याकरिता 450 पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथक रेल्वेमार्गावर दररोज किमान चार किलोमीटर चालत जाते. मार्गालगतची 100 बेकायदा प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे. 

जानेवारीत उत्तर प्रदेशात एक्‍स्प्रेस गाडीला अपघात झाला होता. तो अपघात नसून घातपात असल्याचे राष्ट्रीय तपास पथक आणि दहशतवादविरोधी पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली. यानंतर नवी मुंबई, नाशिक येथेही रेल्वेरुळांवर तुटलेले रूळ आडवे टाकलेले दिसले. याविषयी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथके तपास करत आहेत. नुकतीच रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी सुरक्षेबाबत चर्चा झाली. त्यानुसार पोलिसांनी एक योजना आखली आहे. तिन्ही मार्गांवर गस्त घालण्यासाठी 450 पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात चार सशस्त्र जवान आहेत. प्रत्येक पथक रेल्वेमार्गावर दररोज किमान चार किलोमीटर गस्त घालते. रात्रीही गस्त घातली जाते. एखादी संशयास्पद वस्तू दिसल्यास त्याची माहिती रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. 

कित्येकदा गॅंगमन रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत रुळांमध्ये दुरुस्तीचे काम करतात. त्यांच्या कामाबाबतही माहिती विचारली जाते. रुळाचे तुकडे आढळून आल्यास त्याची माहिती संबंधित स्टेशनमास्तरना कळवली जाते. या जवानांना पोलिसांच्या मरोळ येथील केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर अनेक ठिकाणी नागरिक बेकायदा मार्ग ओलांडतात. अशा 100 ठिकाणांची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.

Web Title: Railway police patrol routes to Mumbai