जैविक शौचालयामुळे रेल्वे मार्ग होतायत स्वच्छ; मध्य रेल्वेने बसवले 'इतके' शौचालये...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

रेल्वे मंत्रालयाने संपुर्ण देशभरात रेल्वे कोचमध्ये जैविक शौचालय बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत मध्य रेल्वेने 5 हजार 15  कोचेसमधील सुमारे 18 हजार 450 जैविक शौचालये बसवले आहेत.

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने संपुर्ण देशभरात रेल्वे कोचमध्ये जैविक शौचालय बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत मध्यरेल्वेने 5 हजार 15  कोचेसमधील सुमारे 18 हजार 450 जैविक शौचालये बसवले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचा चार हजार किलोमीटरचा रेल्वेमार्ग घाणीपासून मुक्त झाला आहे. देशभरात रेल्वे कोचेसमधील साध्या शौचालयांना जैविक शौचालयात बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे.  

वाचा ः खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा नवा उपाय; 'हे' अधिकारी ठेवणार लक्ष... 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि रेल्वे रुळावरची  घाण कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केला होता. रेल्वेच्या प्रत्येक विभागाने जैविक शौचालय बसवण्याची मोहीम सुरु केली होती. यामध्ये मध्य रेल्वेने 18 हजारापेक्षा जास्त जैविक शौचालये बसवले आहेत. मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातील चार हजार किलोमीटरचा रेल्वेमार्गावर आता घाण दिसणार नाही. यापूर्वी दिवसाला 30 ट्रक भरेल एवढी  घाण रेल्वे मार्गावर टाकली जायची. मात्र, या जैविक शौचालयामुळे ही घाण एका विशिष्ट टाकीत जमा होणार आहे. 

वाचा ः मुंबईकरांनो... सोमवारपासून बेस्ट धावणार; प्रवासी क्षमता 'इतकी' असणार

रेल्वे मार्गांवर मल, मुत्र पडत असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना सुद्धा अनेकवेळा रुळाचे काम करतांना घाणीचा सामना करावा लागत होता. शिवाय रेल्वे स्टेशन परिसरही स्वच्छ ठेवणे अशक्य होते. रेल्वे स्वच्छ करण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या उपक्रमाला राज्यासह देशभरात चांगला प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. भविष्यात ई-टॉयलेट लावण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. 

पश्चिम रेल्वेत जैविक शौचालये बसवण्याचे काम 99 टक्के पुर्ण झाले आहे. केवळ डबल डेकर रेल्वेगाड्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे शौचालयांचे काम सुरु झालेले नाही. देशभरात 68,690 रेल्वे कोचेसमध्ये जुन्या शौचालयांना जैविक शौचालयात बदलण्यात आले आहे.तर उर्वरीत 400 कोचेसमध्ये ही प्रक्रीया सुरु आहे. 

वाचा ः वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा...

जैविक शौचालये म्हणजे काय ?
जैविक शौचालयमध्ये विशिष्ट जीवाणूद्वारे मलाचे विघटन करून गॅस आणि पाण्यात रूपांतर होते. त्यामधून मिथेन गॅस तयार होतो. उर्वरित पाणी रुळावर पडते. त्यामुळे रूळावर घाण होत नाही आणि रुळावर मलमूत्र पडत नाही. यापूर्वी मलमूत्र रेल्वे रूळावर पडल्याने रुळाला जंग लागायचा त्यामुळे संपूर्ण रूळ बदल्यांचे काम करावे लागत होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होते, मात्र आता बचत होत आहे.

वाचा ः  अरे वाह! मान्सूनसाठी कोंकण रेल्वे सज्ज; लवकरच लागू होणार वेळापत्रक.. 

प्रवाशांनी ही खबरदारी घ्यावी
रेल्वे प्रवाशांनी बायो-टॉयलेटमध्ये कसल्याही प्रकारच्या बाटल्या, पाऊच, सॅनिटरी नॅपकिन अशा प्रकारचा कचरा शौचालयात टाकू नये, त्यामुळे शौचालय बंद होऊन रेल्वेमध्ये घाण पसरू शकते, यासाठी प्रवाशांनीच गाडीतील कचरा कुंडीचाच वापर करावा, असे आवाहन सुद्धा मध्य रेल्वे कडून करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway track becomes more cleaner as railway coaches fits bio toilet