परतीच्या पावसाचे दिवाळीच्या आनंदावर पाणी

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

दिवाळी सुरू असताना जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मात्र शुकशुकाट पसरला आहे. कारण काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र धुडगूस घातला आहे.

पाली (वार्ताहर) : दिवाळी सुरू असताना जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मात्र शुकशुकाट पसरला आहे. कारण काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र धुडगूस घातला आहे. पावसामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. तसेच, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती पैसा नाही. परतीच्या पावसाने त्यांच्या दिवाळी सणावरच पाणी सोडले आहे. परिणामी, व्यावसायिक चिंतेत, तर बळीराजा हताश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते आणि सरकारी कर्मचारी; शिक्षक कामात होते. त्यामुळे खरेदीसाठी कोणीही बाहेर पडले नाही. काही दिवसांपासून परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. अशा वेळी दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत नाहीत. व्यापारी व दुकानदारांनी दिवाळीचा लाखो रुपयांचा माल भरून ठेवला आहे. परंतु, ग्राहक नसल्याने ऐन दिवाळीत वस्तूंना उठाव नाही. त्यामुळे व्यावसायिक व व्यापारी पुरते हवालदिल झाले आहेत. अजून शेतकऱ्यांचे धान्य शेतात आहे. सुगीच्या दिवसांना अजून सुरुवात झालेली नाही. त्यात परतीच्या पावसाने भाताचे पुरते नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. त्यामुळे तो धास्तीत आणि हताश आहे. महिनाअखेर दिवाळी आली असल्याने अनेकांचा हिशोब आणि टाळेबंद बिघडला आहे. आकाशकंदील, इलेक्‍ट्रिक वस्तू आदींचे भाव वाढलेले आहेत. आकाशकंदील, इलेक्‍ट्रिक वस्तू आणि फटाके अतिशय जपून ठेवावे लागत आहे. या वस्तू प्रदर्शनासाठी दुकानाबाहेरही ठेवता येत नाहीत. पाऊस असल्याने विद्युत रोषणाई व आकाशकंदील कुठे लावावे, रांगोळी कुठे काढावी, फटाके कुठे फोडावेत, आदी प्रश्न पडल्याने दिवाळीच्या सणावर आणि आनंदावर विरजण पडले आहे. 

आकाशकंदील, दिव्यांच्या किमतीत ३० टक्‍के वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आकाशकंदील, विजेच्या वस्तू आणि लाईटिंग दिव्यांच्या किमतींमध्ये २० ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात खरेदीसाठी येणारा ग्राहक वस्तूंचा भाव कमी करून मागतो; परंतु भाव कमी करून देणे दुकानदारास परवडत नाही. पालीतील मुकुंद कोसुमकर या दुकानदाराने सांगितले की, पावसामुळे एकतर ग्राहक येत नाहीत आणि वाढीव किमतीमुळे वस्तू विकल्या जात नाहीत. आहे तो माल घाट्यात विकावा लागत आहे.

बच्चे कंपनीचा हिरमोड
दिवाळीत बच्चे कंपनी किल्ले बनवण्यात मशगुल असते; परंतु सततच्या पावसाने मुलांना किल्ले बनवता येत नाहीत. ज्यांनी किल्ले तयार केले आहेत. त्यांचे किल्लेही पावसामुळे खराब झाले किंवा तुटले आहेत. पावसामुळे फटाके फोडता येत नाही. घराबाहेर हौशीने आकाशकंदील व पणत्या लावता येत नसल्याने हिरमोड झाला आहे, असे यज्ञा सुर्वे या लहानगीने सांगितले.

फटाके, कपडे दुकानेही ओस
सततच्या पावसामुळे फटाक्‍यांचा माल खराब होत आहे. धंद्यावरही परिणाम झाला आहे. दिवाळीपेक्षा निवडणुकीत जास्त फटाके विक्री झाली, असे सचिन खिवंसरा या फटाके विक्रेत्याने सांगितले. मातीचे दिवे किंवा पणत्या तर पावसामुळे ओल्या होऊन खराब होत आहेत. तर कपडे विक्रेतेही पावसामुळे ग्राहक न आल्याने मेटाकुटीला आले आहेत. 

परतीच्या पावसामुळे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. पावसामुळे दुकानाबाहेर फटाके ठेवता येत नाही. मागील वर्षीपेक्षा या वर्षी फटाके विक्रीत ५० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.
- दिनेश शहा, फटाके व्यावसायिक, पाली

अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे आकाशकंदील लावायचा कुठे? रोषणाई कुठे करावी? रांगोळी कुठे काढावी? दिवे कुठे लावावेत? हा प्रश्न आहे. पावसामुळे खरेदीसाठीही बाहेर पडता येत नाही. सगळ्यांचाच मोठा हिरमोड झाला आहे. 
- लता माळी, पाली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain effect on Diwali