किनारपट्टीत जोर"धार'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

मुंबई शहर व उपनगरालाही पावसाने झोडपले

मुंबई शहर व उपनगरालाही पावसाने झोडपले
मुंबई - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारीही रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगराला झोडपून काढले. पावसाने सकाळपासून सुरू केलेल्या जोरदार माऱ्यामुळे ठीकठिकाणी पाणी साचले होते. सावित्री नदीने शनिवारी धोक्‍याची पातळी ओलांडल्याने महाड शहर जलमय झाले होते. मुंबईच्या सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे पुन्हा हाल झाले. काही ठिकाणी रेल्वेरूळही पाण्यात गेल्याने लोकलचा खोळंबा झाला.

रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पडणाऱ्या पावसाने प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत. पावसाने 90 टक्के धरणांनी साठवण क्षमता ओलांडली आहे. माथेरानकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर सकाळी दरड कोसळली होती. ती हटविण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील भात लावणीची कामेही पावसामुळे रखडली आहेत. पाणी शिरलेल्या महाड, पेण, नागोठणे, रोहा-अष्टमी, माणगाव नगरपंचायतीचा काही भाग आदी ठिकाणी वीजपुरवठा नागरिकांच्या सुरक्षेसाठी खंडित करण्यात आला होता. त्यामुळे त्याचा परिणाम 15 हजार वीज ग्राहकांना सोसावा लागला. रविवारी सायंकाळपर्यंत काही भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

ठाणे शहरात शनिवारी मुसळधार पडणाऱ्या पावसाने रविवारी काहीशी उसंत घेतल्याचे दिसून आले. सुटीचा दिवस आणि त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने वाहतूक व जनजीवन संथगतीने सुरू होते.

भिंवडीत सकाळी भातसा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यात दोन दिवसांपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. वैतरणा नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरीष पाड्यातील शेतकऱ्यांच्या घरात घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. हिंदमाता, किंग्ज सर्कल, चेंबूर, सायन आदी सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. पावसामुळे मध्य रेल्वेने आजचा नियोजित मेगाब्लॉक मागे घेतला असला तरी सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने आणि अनेक ठिकाणी लोहमार्गावर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळित झाली होती.

पावसाने दैना...
रायगड जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद
गेल्या 24 तासांत 133.09 मिमी. पाऊस
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक संथ
ठाणे जिल्ह्यात मध्य रेल्वेची सेवा विस्कळित
भिवंडीतील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ
भिवंडीत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण
पालघरमध्ये नद्या-नाल्यांना पूर; भातशेतीला फटका
मुंबई पुन्हा तुंबली; ठीकठिकाणी वाहतूक कोंडी

Web Title: Rain in Mumbai