मुंबई, नवी मुंबईत पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई - दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर दाटलेल्या ढगांमुळे बुधवारी मुंबई आणि नवी मुंबईत अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे ऑक्‍टोबर हीटमुळे घामाघूम झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. 

मुंबई - दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर दाटलेल्या ढगांमुळे बुधवारी मुंबई आणि नवी मुंबईत अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे ऑक्‍टोबर हीटमुळे घामाघूम झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. 

सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह आलेल्या जोरदार पावसामुळे वाशी, बेलापूर, माटुंगा, गोरेगाव, बोरिवली, मालाड, दादर, सायन येथे हवेतही गारवा निर्माण झाल्याने नागरिक सुखावले. मुंबईत दिवसभर वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता; मात्र वाढती आर्द्रता आणि पावसाळी ढग यामुळे सायंकाळी जोरदार सरी पडल्या. सायंकाळी 7 वाजता पाऊस सुरू झाला. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांवर अद्याप मोठ्या प्रमाणावर ढग आहेत. त्यामुळे मंगळवारपासून उस्मानाबाद, लातूर, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सायंकाळी असेच ढग मुंबई व नजीकच्या भागांत दिसले. त्यामुळे पाऊस पडल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली. शिवाय, कर्नाटकच्या किनारपट्टीत हवामानातील स्थितीमुळे राज्याच्या किनारपट्टीतील आर्द्रता वाढल्याने मुंबई व नजीकच्या परिसरात पावसाच्या जोराला पोषक वातावरण तयार झाल्याचेही ते म्हणाले. 

दोन दिवसांपासून मुंबईचा तापलेला पारा पावसामुळे कमी झाला. कमाल तापमान तीन अंशांनी खाली येत 34.8 अंश सेल्सिअवर पोहचले. शुक्रवारपर्यंत शहर व उपनगरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Web Title: Rain in Mumbai, Navi Mumbai