ठाणे शहरातील पाऊसच वृक्षांच्या मुळावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पावसाने हजेरी लावल्यापासून मागील अडीच महिन्याच्या कालावधीत तब्बल साडेचारशे वृक्ष उन्मळून पडल्याची नोंद ठाणे पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे करण्यात आली आहे.

ठाणे : पावसाने हजेरी लावल्यापासून मागील अडीच महिन्याच्या कालावधीत तब्बल साडेचारशे वृक्ष उन्मळून पडल्याची नोंद ठाणे पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे करण्यात आली आहे. वृक्षांच्या पडझडीचे कारण शोधून व्यापक उपाययोजना करण्याची योजना महापालिकेने आखली असली, तरी पावसाळ्यातच वृक्ष कोसळत असल्याने प्रशासनासमोर पडझड रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.  
वृक्षांच्या या पडझडीची कारणे शोधून काही उपाययोजना पालिकेच्या उद्यान विभागाने हाती घेतल्या. त्यानुसार, वृक्षांच्या सभोवतालचे सिमेंट काँक्रिट आणि लोखंडी जाळ्या व कठडे तोडून टाकण्याचे आवाहन रहिवाशांना करण्यात आले. मात्र, १० मे रोजी पहिल्याच पावसात मोठे वादळ किंवा वाराही नसताना अचानक एकामागोमाग एक अशी तब्बल २२ झाडे कोसळून पडली होती. 
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात वृक्षप्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही कुणीही प्रतिसाद दिला नाही.

 ठाणे शहरातील बहुतांश रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी जमीन शिल्लक राहिलेली नाही. झाडांच्या बुंध्याशी काँक्रीट, पेव्हर ब्लॉक, डांबर आदींचा थर जमा झाल्याने वृक्षांची पाळेमुळे कमकुवत बनून सरतेशेवटी वृक्ष सुकून कोसळतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्षांसभोवती आळे बनवून पुरेशी माती घालण्याचे सूचवले होते. मात्र, याची अंमलबजावणी झालेली नाही. पालिकेचा वृक्षप्राधिकरण विभाग वृक्ष संवर्धनाऐवजी वृक्ष तोडीमुळेच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 
- रोहित जोशी, पर्यावरण तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Thane city is at the root of the trees