पावसाने दिवाळीवर फेरले पाणी 

पावसाच्या पाण्यात गेलेली शेती
पावसाच्या पाण्यात गेलेली शेती

किन्हवली : परतीचा पाऊस फारच लांबल्याने यंदाच्या दिवाळीवर पावसाने पाणी फेरले. दिवाळीपूर्वीपासून रोजच कोसळणाऱ्या पावसामुळे भातकापणी रखडली असून तयार झालेले भाताचे दाणे पावसाच्या माऱ्याने गळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी याच पिकाच्या जोरावर दिवाळसण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली. पावसात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. 


मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी दहा दिवस आधीच आल्याने शेतीची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. मागच्या वर्षी 8 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा साजरा झाला होता. मात्र या वर्षी 28 ऑक्‍टोबरलाच बलिप्रतिपदा आल्याने शेतकऱ्यांचे शेतीकामाचे सर्वच नियोजन बारगळले. शिवाय मागच्या वर्षी ऑक्‍टोबरच्या पहिल्याच आठवड्यात पसार झालेला परतीचा पाऊस या वर्षी ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही धुमाकूळ घालत होता. त्यात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पीक कापणीयोग्य होऊनही कडपे पावसात भिजण्याच्या भीतीने शेतातच उभे ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दरवर्षी दिवाळीपूर्वीच भात कापून, झोडून त्याची विक्री करणारे शेतकरी या वर्षी मात्र पाऊस थांबण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे साहजिकच या दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात सणाचा उत्साह दिसून आला नाही. काही शेतकऱ्यांनी कापलेले भात पाण्यात कुजून वाया गेले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले तरी सरकारच स्थापन झालेले नसल्याने लगेचच फार मोठी सरकारी मदत मिळण्याची शक्‍यता नाही. परिणामी यंदा ग्रामीण भागातील बाजारपेठांतही खरेदीचा उत्साह जाणवत नसल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली. 

शेतकऱ्यांनी सोडली आशा... 
शेतकऱ्यांनी भाताचे भारे टाकण्यासाठी बनवलेली खळीही पावसात धुवून गेल्याने पाऊस येत्या दोन दिवसात थांबला तरी पुन्हा खळी तयार करण्यासाठी वेळ जाणार असल्याने दिवाळसण यथातथाच साजरा होणार, असे चित्र आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजता शहापूर तालुक्‍यातील किन्हवली, डोळखांब परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भातपीक हातात मिळेल, ही अशाच सोडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com