
Chandrakant Patil vs Ajit Pawar : आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार धारा
मुंबई : परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पुणेकर पाण्यात अडकले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमुळे मुंबईत मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार धारा कोसळत राहिल्या. पुण्यातील अतिवृष्टीला एकमेकांच्या काळातील कारभार जबाबदार असल्याचे सांगत आजी-माजी कारभाऱ्यांनी अर्थात, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी परस्परांचा सत्ताकाळ उघडा पाडला. उणीदुणी काढण्यातून पुण्यातील धोकादायक स्थितीची चौकशी करण्यापलीकडे काही साध्य झाले नसल्याचे दिसून आले आहे.
परतीच्या पावसामुळे सोमवारी (ता.१७) रात्री धुमाकूळ घातल्याने पुण्यातील रस्ते, वस्त्या आणि सोसायट्यांत पाणी शिरून लोकांचे प्रचंड हाल झाले. त्यावरून पुणे महापालिकेतील नव्या-जुन्या म्हणजे, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांच्या कारभाराला दोष दिले. या राजकीय वादाचे पडसाद राज्याच्या वर्तुळातही उमटले. स्मार्टसिटीचे स्वप्न दाखवून भाजपने पुणे शहराचे वाटोळे केल्याचा घणाघात पवार यांनी भाजप नेत्यांवर केला तर अडीच वर्ष पुण्याचे पालकमंत्रिपद असताना कसा काटा लावला, याची उदाहरणे आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी पवार यांच्यावर पटलवार केला. हे दोन्ही मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार इतर गोष्टींत व्यग्र
‘‘पुण्यात पालकमंत्रिपद हे अडीच वर्षे अजित पवार यांच्याकडे होते. या काळात पालकमंत्री म्हणून कसा काटा लावला, याची उदाहारणे आहेत. तुमच्या सत्तेत महापालिकेला दमवले; तेव्हा ही कामे का करून घेतली नाहीत, असा सवाल करीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील स्थितीला पवार जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्रिपद असताना तुम्ही इतर गोष्टींत व्यग्र होता, असा टोलाही पाटील यांनी लगावला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना जेवणापासून राहण्याची व्यवस्था करीत आहोत. धान्य आणि इतर सुविधाही पंचनामे करण्याआधी पुरविण्यात येणार आहेत त्याबाबत स्थानिक यंत्रणांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पावसाच्या पाण्याचा निचरा का होत नाही, याची चौकशी केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याकडे भाजपचे दुर्लक्ष
‘‘स्मार्टसिटीचे स्वप्न दाखवून भाजपने पुणे शहराचे वाटोळे करून ठेवले आहे. भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेने पुण्यात काय दिवे लावून ठेवले आहेत, त्याची कल्पना अतिवृष्टीमुळे येते,’’ असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील पूरस्थितीचे खापर भाजप नेत्यांवर फोडले.ते म्हणाले, ‘‘पावसामुळे ओढवलेल्या स्थितीत पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अवस्थेची कारणे काय आहेत, ती महापालिकेला सांगावी लागतील. पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. वाहतूक व्यवस्था अडचणीत आली; तरीही त्याकडे कोणाचे लक्ष नाही. शहरांत जागोजागी पाणी साचले असून, त्याकडे ज्या प्रकारे लक्ष देणे अपेक्षित आहेत, तसे होत नाही. लोकांना तातडीने सुविधा दिल्या पाहिजेत.’’ यांसदर्भात माध्यमांसोबत संवाद साधल्यानंतर पवार यांनी ट्विट करूनही भाजपवर निशाणा साधला आहे.ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमणे करून इमारती बांधल्या जातात. मी पालकमंत्री असताना अतिक्रमणांकडे दुर्लक्ष न करता ती पाडण्याची भूमिका घेतली होती. त्यात राजकारण आणू नये, असेही सांगितले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.