मुंबई : मिठीचे पाणी शिरले क्रांतीनगरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता, पावसाचा जोर कायम राहिल्याने आज पहाटे क्रांतीनगरातील वस्तीत पाणी शिरले. त्यामुळे पहाटे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पाणी वाढण्याचा धोका असल्याने स्थानिक नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी तत्काळ घर सोडले. 

मुंबई : रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता, पावसाचा जोर कायम राहिल्याने आज पहाटे क्रांतीनगरातील वस्तीत पाणी शिरले. त्यामुळे पहाटे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पाणी वाढण्याचा धोका असल्याने स्थानिक नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी तत्काळ घर सोडले. 

मुंबईतील दहिसर, पोयसर या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या वस्त्या जलमय झाल्या. पावसाने लोकांचे आज प्रचंड हाल झाले. स्थानिकांना एनडीआरएफ, नेव्ही आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतीचा हात दिला. पावसाचा अंदाज नसल्याने क्रांतीनगरातील स्थानिक निर्धास्त होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज पहाटे मुठीने धोक्याची पातळी ओलांडली आणि या भागातील राहिवाशांना मिठीची पुन्हा धडकी भरली.

त्याबाबत क्रांती नगरातील रहिवाशी किशोर सोनार यांनी सांगितले की, विमानतळाच्या भिंतीला लागून असलेल्या क्रांती नगरातील राहिवाशांच्या घरात पहाटे पाणी भरण्यास सुरवात झाली. त्यानंतर सर्व रहिवाशी सावध झाले, पावसाचा जोर वाढत होता. बैठ्या घरातील राहिवाशांनी जीव वाचविण्यासाठी लगेच स्थलांतर सुरू केले. नंतर पाणी वाढू लागल्याने नदीचा धोका वाढला. आता आमच्या घरात सहा फूट इतके पाणी भरले होते. घरातील सगळ्या सामानसुमानाचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यातील येथे पाणी भरण्याची ही चौथी वेळ आहे. या पावसाळ्यात आमचे खूप हाल झालेच पण त्यापेक्षा आमचे नुकसान खूप झाले आहे. आमचे नुकसान झाले तरी आमच्याकडे सरकार कधीही बघत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

मिठी नदीच्या पुरामुळे क्रांतीनगर, संदेशनगर, बैलबाजार, कुर्ला सीएसटीरोड आदी भाग जलमय झाला होता. पुराच्या पाण्यात वाहने जवळजवळ बुडाली होती. अडकून पडलेल्या या भागातील राहिवाश्याना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी एनडीआरएफ, नेव्ही, अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठी मदत केली. सुमारे 1300 नागरिकांना या पथकांनी सुरक्षितस्थळी हलविले. त्यापूर्वी काही रहिवाशी स्वतःहून स्थलांतरित झाले होते. 

दहिसर, पोयसर नद्याही धोक्याच्या

दहिसर, पोयसर या नद्यानीही आज धोक्याची पातळी ओलांडल्याने या नद्यांचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले होते. उशिरा पर्यंत पाण्याचा निचरा होंवू शकला नव्हता. त्यामूळे रहिवाशांचे हाल झाले. पुराच्या पाण्यात वाहने अडकून पडली होती. नद्यांच्या भागातील रस्ते जलमय झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain water in Mumbai Krantinagar