esakal | गणेशमूर्तींच्या रंगकामाला पावसाचा अडसर!
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रंग सुकत नसल्याने गणेशोत्सवासाठी घरांची रंगरंगोटीही रखडली

गणेशमूर्तींच्या रंगकामाला पावसाचा अडसर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : गणेशोत्सव दहा दिवसांवर आल्याने घरोघरी गणेशभक्तांची साफसफाई व रंगरंगोटीची लगबग सुरू झाली आहे. श्रावण महिना संपत आला, तरीही पावसाने अद्याप उघडिप न घेतल्याने घरांचे रंग सुकण्यात पावसाचा अडसर निर्माण झाला आहे; तर दुसरीकडे गणेश मूर्तींच्या रंगकामालाही पावसाचा फटका बसत असल्याने मूर्तिकारदेखील चिंताक्रांत बनले असून रंग सुकवण्यासाठी पंखे आदी यांत्रिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

श्रावण महिना सरत असून आता सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. शहरातदेखील घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी घरांमध्ये रंगरंगोटी आणि सजावट करण्यास सुरुवात केली आहे; मात्र अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रता असल्याने थंडाव्यामुळे भिंतींचा रंग सुकण्यात विलंब होत आहे. त्यामुळे रंगारी कामगारांचीदेखील अडचण होत असून दोन दिवसांच्या कामाला दुप्पट कालावधी लागत असल्याचे अनेक रंगाऱ्यांनी सांगितले.

मूर्तिकारही चिंताक्रांत 
दुसरीकडे गणपती कारखान्यांमध्येही मूर्तिकारांची लगबग सुरू झाली असून गणेशमूर्तींच्या रंगरंगोटीमध्ये पावसाचे विघ्न येत आहे. अनेक मूर्तीचा रंग अद्यापही ओलसर असल्याने मूर्ती सुकवण्यासाठी पंखे अथवा एअर स्प्रेचा वापर केला जात आहे. 

शहरी भागात घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण तितकेसे नसले, तरी अनेक जण ऐन गणेश चतुर्थीमध्ये घरांची सजावट व रंगरंगोटी करीत असतात. यंदा घरांसाठी लागणाऱ्या रंगांच्या किमती 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढल्या असून पावसामुळे रंगवलेल्या भिंती सुकण्यास विलंब होत आहे. 
- हरेश पाटकर
, रंगारी मजूर

loading image
go to top