साेसायट्यांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा आधार

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

खारघरकरांची पाणीटंचाईवर मात; पावसाच्या पाण्याचा टाकीत साठा

मुंबई : पावसाळ्यातही खारघरमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने सेक्‍टर १९ मधील अंगण सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सोसायट्यांना आधार मिळाला असून प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला आहे. 

खारघर परिसरात हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि त्यामुळे सोसायटीत होणारे वाद टाळण्यासाठी पावसात छतावरून कोसळणारे पाणी अडवून त्यांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे सोसायटीच्या टाकीमध्ये पाणीसंचय केला जात आहे. ही संकल्पना सोसायटीतील रमेश पटेल, अरविंद पटेल, दिलीप पटेल, राजेश पटेल, कल्पेश पटेल आणि संजय पटेल या सदस्यांनी मांडली. हा प्रकल्प सुरू करून वीस दिवस झाले. वीस दिवसांत सोसायटीमधील सदस्य रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमा होणाऱ्या पाण्याचा दैनंदिन उपयोग करत आहेत. छतावर जमा होणारे पाणी पीव्हीसी पाईप आणि फिल्टरची जोडणी करून थेट सोसायटीच्या टाकीत जमा केले जाते. या पाण्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी केला जातो. याबाबतची माहिती खारघर परिसरातील अनेक सोसायटीचे सदस्य घेत आहेत.

सोसायटीत २५ हजार लिटर क्षमतेची टाकी आहे. छतावरील पाणी टाकीत सोडले जाते. जोडण्यात आलेल्या पाईपच्या मध्यभागी फिल्टर जोडणी केली आहे. जमा केलेला पाणी शुद्ध असून पाणीटंचाईवर मात केल्याने सोसायटीमधील सदस्य समाधानी आहेत.
- ब्रिजेश पटेल, सदस्य, 
अंगण सोसायटी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Rainwater Harvesting'