वाणिज्य ‘पावसाळी शेड’ रडारवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पावसाचे कारण दाखवून शेड उभारून व्यवसायासाठी वापर करणाऱ्या व्यावसायिकांना दणका बसला आहे...

नवी मुंबई - पावसाळी शेड उभारण्याची तात्पुरती परवानगी घेऊन वाणिज्य वापर करणाऱ्या इमारतींवर लवकरच महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. बेकायदा पद्धतीने वाणिज्य वापर सुरू असलेल्या शेकडो इमारतींना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना महिनाभरात टेरेसवर लावलेले पत्र्याचे शेड काढण्यास सांगण्यात आले असून, महापालिकेकडून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे; तर रहिवाशी इमारतींना तूर्त वगळण्यात आले असून, महापालिकेकडून परवानगी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

महापालिकेच्या दिघा ते बेलापूरपर्यंतच्या हद्दीत इमारतींवर तात्पुरती परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या पावसाळी शेडला महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतर नवी मुंबईतील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांचे धाबे दणणाले आहेत; परंतु महापालिकेकडून पावसाळी शेडवर दोन टप्प्यांत कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सामाजिक संघटनांनी उभारलेल्या इमारतींवर पत्र्याची शेड उभारून त्याचा वाणिज्य वापर सुरू असलेल्या इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा इमारतींकडून पावसाळ्यासाठी शेड बांधण्याची परवानगी घेऊन नंतर टेरेसवर पार्ट्या, लग्न समारंभासह विविध कंपन्यांना स्नेहसंमेलन भरविण्यासाठी भाडेतत्त्वावर देऊन लाखो रुपये कमवले जातात. अशा इमारतींवर सर्वात प्रथम कारवाईचा हातोडा पडेल. जिमखाने, काही सामाजिक संघटनांच्या इमारती, धार्मिक बहुउद्देशीय इमारती, विविध सोसायट्यांची कार्यालये आणि हॉटेलांच्या टेरेसवर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवर कारवाई करण्यात येणार आहे; तर रहिवाशी इमारतींवरही मोठ्या प्रमाणात पत्र्याच्या शेड उभारण्यात आल्या आहेत. अशांनाही महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. मात्र अनेकांनी इमारतीची खराब झालेली परिस्थिती हे कारण पुढे करून इमारतीमध्ये होणारे लिकेज थांबवण्यासाठी पत्रे लावण्याचा मुद्दा महापालिकेसमोर मांडला आहे. पत्रे काढल्यास इमारतीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे होणारे लिकेज पुन्हा सुरू होऊन इमारतीचे आयुर्मान कमी होईल, अशी भीती काही सोसायट्यांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने रहिवाशी इमारतींवरच्या टेरेसवर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवर सरसकट करण्यात येणाऱ्या कारवायांना तूर्त स्थगिती दिली आहे; तर तक्रारी प्राप्त इमारतींवर दुसऱ्या टप्प्यात कारवाई होईल.

कारवाईचा बडगा वाचवण्यासाठी
कारवाईच्या बडग्यापासून बचाव होण्यासाठी रहिवासी इमारतींच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेकडून पावसाळी शेडची रीतसर परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. अशा इमारतींना पत्र्याची शेड नियमित करण्यासाठी त्यांचा वाढीव चटई क्षेत्र वापरता येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Web Title: rainy shed