राज ठाकरे यांचा 'मातोश्री'कडे प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यास इच्छुक असल्याचा निरोप घेऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी युतीचा प्रस्ताव "मातोश्री'वर दिला. शिवसेना आणि मनसेतील आजच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, यावर नवीन राजकीय समीकरणांची मांडणी होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यास इच्छुक असल्याचा निरोप घेऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी युतीचा प्रस्ताव "मातोश्री'वर दिला. शिवसेना आणि मनसेतील आजच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, यावर नवीन राजकीय समीकरणांची मांडणी होणार आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी "मातोश्री'वर उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई व राहुल शेवाळे, आमदार अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे राज यांचा निरोप दिल्याचे समजते. त्यानंतर, उद्धव यांच्याशी चर्चा करून कळवतो, असे शिवसेना नेत्यांनी नांदगावकर यांना सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना- मनसे महापालिकेत एकत्र येणार का, अशी चर्चा होती. त्यातच आता नांदगावकर यांनी थेट "मातोश्री'ची पायरी चढल्याने या चर्चांना एक प्रकारे दुजोरा मिळाला आहे. मात्र, उद्धव यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निवडणुकांच्या वातावरणात शिवसेना- भाजप युतीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होतो, त्या वेळी मनसे "फॅक्‍टर' हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो. हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- मनसे एकत्र येणार अशी नव्याने चर्चा सुरू झाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपची युती तुटली, त्या वेळी मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा जोरात रंगली होती. राज- उद्धव यांच्यात प्रत्यक्षात फोनवर चर्चाही झाली होती. मात्र, दोन्ही बंधूंच्या मनोमिलनाचा निर्णय होऊ शकला नाही.

भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर लगेच शिवसेना आणि मनसे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला दोन्ही बाजूच्या नेत्यांनी केलेल्या विधानांनी पाठबळ मिळते आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी "शत्रूचा शत्रू तो आमचा मित्र' असे विधान केले, तर नांदगावकर यांनी या दोन भावांनी एकत्र येण्यासाठी आपली राजकीय हयात खर्ची करण्याचे वक्‍तव्य केले होते. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गोव्यातील वक्‍तव्याने या चर्चेला दुजोरा मिळत आहे. युतीबाबत मनसेचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही असे विधान राऊत यांनी केले होते, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पुण्यात दोन बंधू एकत्र आल्यास इतिहास घडेल, असे विधान केले होते. यापुढे एक पाऊल टाकत नांदगावकर यांनी युतीचा प्रस्ताव शिवसेनेकडे आज दिला.

Web Title: raj thackeray proposal to sena