आज बाळासाहेब असायला हवे होते, असं म्हणत राज ठाकरे झाले भावूक

पूजा विचारे
Wednesday, 5 August 2020

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या मंगलप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आज या मंगलप्रसंगी बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

अयोध्येत राम मंदिर उभं राहावं यासाठी मोदी सरकारकडून करण्यात आलेले प्रयत्न निश्चितच वाखणण्यासारखे आहेत, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. 

अधिक वाचाः  महाड शहरात पूरस्थिती; सावित्री नदीच्या पुराचं पाणी शहरात, नागरिकांमध्ये घबराट
 

राज ठाकरे यांनी काय म्हटलं आपल्या पोस्टमध्ये 

जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमावावा लागला. आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गती मिळेल. यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जे प्रयत्न केलेत ते निश्चितच वाखणण्यासारखे आहेत. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचाः  मुंबईकर, पुढचे २४ तास सावध राहा; हवामान खात्याचा इशारा

अयोध्येत उभं राहणारं राम मंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगातिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणून या क्षणाचं महत्त्व वेगळं आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे. असं म्हणत त्यांनी सर्व हिंदू बांधवांचं अभिनंदन केलं आहे.

Raj thackeray remember balasaheb thackeray on ram mandir bhoomi pujan ayodhya


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj thackeray remember balasaheb thackeray on ram mandir bhoomi pujan ayodhya