सेना-भाजपने सत्ता असून काय केलं : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

आरोग्यावर शेकडो कोटी रुपये, तसेच शिक्षणावर पाचशे कोटीहून अधिक रुपये दरवर्षी खर्च करण्यात येत आहेत. पण त्यामध्ये कोणताही विकास झालेला दिसत नाही. 

मुंबई- आता आम्ही हे करू, ते करू असं सांगत आहेत. परंतु आतापर्यंत सत्ताधारी शिवसेनेने पाचवेळा मुंबई महापालिकेमध्ये सत्ता उपभोगली. इतकी वर्षे त्यांनी काय केलं ते सांगा, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. 

मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राज यांनी पहिलीच प्रचारसभा घेतली. आपला मुलगा रुग्णालयात होता, त्यामुळे मी मैदानात लवकर उतरू शकलो नाही, असे त्यांनी स्पष्ट करीत सत्ताधारी युती सरकारमधील पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

मुंबईतील भ्रष्टाचाराबद्दल भाजपवाले शिवसेनेवर टीका करीत आहेत. परंतु मागील 25 वर्षे ते शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत आहेत. त्यांनीही भ्रष्टाचार केलाच ना, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. 

नवा भारत कुठे आहे?

पाच राज्यांमध्ये 3365 एवढे उमेदवार आहेत. भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला एक कोटी रुपये दिले होते असे एका भाजप नेत्यानेच मला सांगितले. आता उत्तर प्रदेशात भाजपचे 400 उमेदवार आहेत. तिथे भाजप, सप-काँग्रेस, बसप यांनी प्रत्येकी 400 कोटी रुपये खर्च केले तर एकूण 1200 कोटी रुपये असेच तिथे रोख खर्च होणार आहेत. मग, कुठे आहे कॅशलेस इंडिया, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

नोटाबंदी करताना फार आवेशाने सांगितले जात होते की तुम्हाला नवा भारत दिसेल. कुठे आहे तो नवा भारत? त्याच पद्धतीने कारभार चालू आहे. 

मुंबईत केवळ खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी शंभर कोटी रुपयांचे टेंडर काढले जाते. त्यामध्येही भ्रष्टाचार करण्यात येतो. 
काही वर्षांपूर्वी मला नाशिकमध्ये काय केलं असा प्रश्न विचारत होते. आता का विचारत नाहीत. कारण, तिथे आम्ही केलेलं काम दिसत आहे. पुढील 40 वर्षे नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. 
बाळासाहेबांचे स्मारक उभे केले. गोदावरी नदीवरील कारंजा, बोटॅनिकल गार्डन पाहा. तिथे 50 ते 60 हजार लोकांनी भेटी दिल्या. मुंबईतही असं गार्डन नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 
 

Web Title: raj thackeray slams bjp, shiv sena in bmc poll campaign